Agricultural News : कर्जमाफी देता येत नसल्यास व्याजमाफी द्या
esakal April 29, 2025 06:45 PM

नाशिक- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदारांना कर्जमाफी देणे शक्य नसेल तर किमान व्याजमाफी करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक घेऊन थकबाकीदारांना व्याजात सवलत दिली. परंतु, शेतकरी संघटनेने त्यास नकार देत कर्जमाफी किंवा व्याजमाफीचा मुद्दा पुन्हा लावून धरला आहे. शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी कार्यकारी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, दिलीप पाटील, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते, दगाजी अहिरे, आनंदा चौधरी यांनी शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता. २८) श्री. झिरवाळ यांची भेट घेतली.

एक लाखापर्यंत दोन टक्के व्याज आकारणी करावी, तसेच पाच लाखांपर्यंत तीन टक्के, १० लाखांपासून पुढे पाच टक्के व्याज आकारण्यात येईल, असे आश्वासन दिले. मृत सभासदांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सहा हजार सभासद मृत आहेत. त्यांच्या वारसांनाही हा व्याजमाफीचा लाभ मिळेल. याचबरोबर जे शेतकरी लवकर कर्ज भरतील, त्यांच्या बाबतीतही व्याजमाफीचा विचार करण्याची विनंती आपण उपमुख्यमंत्री पवार यांना करू, असे आश्वासन मंत्री झिरवाळ यांनी शेतकरी संघटनेला दिल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.