आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी झालेल्या मेगा लिलावापासून एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे वैभव सूर्यवंशी… वैभव सूर्यवंशीला वयाच्या 14व्या वर्षी आयपीएल लिलावात चांगला भाव मिळाला. आयपीएल लिलावात वैभव सूर्यवंशी 30 लाखांच्या बेस प्राईससह उतरला होता. पण राजस्थान रॉयल्स संघाने 1 कोटी 10 लाख रुपये मोजले. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आयपीएल स्पर्धेत पदार्पणाची संधी मिळाली. या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूत षटकार मारून लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे वैभव सूर्यवंशीत काहीतरी खास आहे याची जाणीव होऊ लागली. तिसऱ्या सामन्यातच त्याने 35 चेंडूत शतकी खेळी केली. त्यामुळे त्याच्या नावाचा उदो उदो सुरु झाला. वैभवच्या नावाचा इतका गवगवा होत असताना त्याची जडणघडण कशी याची उत्सुकता अनेकांना आहे. याबाबत त्याचे प्रशिक्षक मनिष ओझा यांनी क्रिकेटनेक्स्ट दिलेल्या मुलाखतीत उलगडा केला.
वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनिष ओझा यांनी सांगितलं की, मी त्याला विचारलं की तू सिंगल घेण्याचा प्रयत्न का करत नाहीस? तेव्हा त्याने उत्तर दिलं की, जर मी षटकार मारू शकतो तर सिंगल का? प्रशिक्षक ओझा यांनी पुढे सांगितलं की, कमी वयातच तो त्याच्या खेळाबाबत स्पष्ट होता. त्याची फलंदाजीची शैली आणि त्याच्या शॉट्सची निवड योग्य होती. त्याच्या वयाच्या मानाने तो इतर खेळाडूंच्या तुलनेत 10 वर्षे पुढे आहे. वैभव कायम आक्रमकपणे खेळला आहे. प्रतिस्पर्ध्यांना कधीच आपल्यावर हावी होऊ देत नाही. मग त्याच्या समोर कोणताही गोलंदाज असला तरी त्याला फरक पडत नाही. लहान मुलं शक्यतो सिनियरचा सामना करताना चिंतेत असतात. पण वैभव यांच्यापेक्षा वेगळा आहे. त्याने आपला दृष्टीकोन कधीच बदलला नाही.
वैभव सूर्यवंशीने सांगितलं की, ‘मला यशस्वी जयस्वालसोबत फलंदाजी करायला आवडतं. तो कायम सकारात्मक चर्चा करतो. तसेच चांगलं करण्यासाठी प्रोत्साहीत करतो.’ शतकाबाबत वैभवने सांगितलं की, ‘आयपीएलमध्ये शतक करणं एका स्वप्नासारखं आहे. मी मागच्या 4-5 महिन्यांपासून खूप सराव केला आहे. त्याचा मला आता खूप फायदा होत आहे. मला कोणत्याच गोष्टीची भीती नाही. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे.’ वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीनंतर त्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पुढच्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.