वॉटर टॅक्सी प्रकल्प लवकरच मार्गावर
पालघर जिल्ह्यातील रहदारीला दिलासा; रो-रो सेवेनंतर आता
विरार, ता. २९ (बातमीदार) : मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. वसई-विरारमध्ये भाईंदर-वसई आणि आता मार्बल ते खराडी अशी रो-रो सेवा सुरू झाली. त्यानंतर आता आणखीन जलद प्रवासासाठी लवकरच वॉटर टॅक्सी प्रकल्प मार्गी लागणार असल्याने येथील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारने मुंबईतील वाढत्या रहदारीच्या समस्येवर उपाय म्हणून ‘मुंबई वॉटर टॅक्सी प्रकल्प’ हाती घेतला असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाचे तांत्रिक सहकार्य घेतले जात आहे. याअंतर्गत मुंबई महानगर प्रदेशात १५ नवीन जेट्टींचे बांधकाम करण्यात येणार असून, नऊ जलमार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
---------------------------
दोन तासांचा प्रवास ५० मिनिटांमध्ये
सध्या २१ संभाव्य साइट्स ओळखल्या गेल्या असून, पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणी जेट्टी उभारण्यात येतील. दक्षिण मुंबई ते वसई हा प्रवास दोन तासांहून अधिक वेळ घेतो. मात्र वॉटर टॅक्सीमुळे तोच प्रवास केवळ ४० ते ५० मिनिटांत पूर्ण होईल. याचप्रमाणे कल्याण ते वसईचा प्रवासही अडीच तासांवरून ३५ ते ४५ मिनिटांवर येणार आहे.
==============================
महत्त्वाचे जलमार्ग
नारंगी - वज्रेश्वरी - वसई - मिरा भाईंदर - फव्वारा जेट्टी - गायमुख - नागलेकोलशेत - काल्हेर - मुंब्रा - कल्याण
कल्याण - मुंब्रा - मुलुंड - ऐरोली - वाशी - गेटवे
मिरा भाईंदर - वसई - बोरिवली - नरिमन पॉइंट
बोरिवली - गोराई - नरिमन पॉइंट
मांडवा - बेलापूर - गेटवे - मांडवा
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात रो-रो सेवा आणि वॉटर ॲम्ब्युलन्सदेखील सुरू करण्याची योजना आहे.
=====================================
२०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
कोची वॉटर मेट्रो प्रकल्पाचे प्रतिनिधी नुकतेच मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्या अहवालानंतर महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, पुढील दोन वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
MUM25E87915