Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Marathi Update: कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये मंगळवारी विजय मिळवून Playoff चे गणित रंजक बनवले आहे. फॅफ ड्यू प्लेसिस व अक्षर पटेल ही जोडी मैदानावर असेपर्यंत दिल्ली कॅपिटल्सला विजयाची आशा होती. पण, सुनील नरीनने त्याच्या दोन षटकांत ३ विकेट्स घेऊन मॅच फिरवली आणि त्यानंतर वरुण चक्रवर्थीने सलग दोन विकेट्स घेऊन मॅच KKR च्या बाजूने पूर्णपणे झुकवली. या पराभवामुळे DC गुणतालिकेत मधल्यामध्ये लटकले आहेत.
दिल्लीला दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. अभिषेक पोरेल ( ४) अनुकूल रॉयच्या गोलंदाजीवर बाद झाला. करुण नायरला (१५) शांत ठेवण्यात वैभव अरोराला यश आले. फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलला ( ७) अती घाई नडली अन् तो रन आऊट झाल्याने दिल्लीची अवस्था ३ बाद ६० अशी झाली. फॅफ ड्यू प्लेसिस व अक्षर पटेल ही जोडी मैदानावर उभी राहिली. एक हात दुखत असूनही अक्षर वेदनेसह खेळला आणि त्याने फॅफसह ४२ चेंडूंत ७६ धावांची महत्त्वाची भागीदारी करून मॅच दिल्लीच्या बाजूने झुकवली.
१४व्या षटकात सुनील नरीनच्या गोलंदाजीवर अक्षर झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४३ धावा केल्या. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्रिस्तान स्तब्सचा ( १) त्रिफळा उडवून नरीनने KKR ला मोठे यश मिळवून दिले. फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी दिल्लीने विपराज निगमला पुढच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. दिल्लीला विजयासाठी ३० चेंडूंत ५९ धावा करायच्या होत्या आणि हे लक्ष्य पार करण्यासारखे होते.
नरीनने त्याच्या पुढच्या षटकात आणखी एक मोठी विकेट मिळवून दिली. फॅफ ४५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६२ धावांवर झेलबाद झाला. आशुतोष शर्मा व विपराज यांच्यावर आता दिल्लीची भीस्त होती आणि दोघांनी चांगला खेळ केला. आशुतोषने एका हातने सुरेख षटकार खेचून दिल्लीवरील दडपण कमी केले. पण, तरीही शेवटच्या ३ षटकांत ४६ धावा दिल्लीला करायच्या होत्या. हर्षितच्या १७व्या षटकात ११ धावा आल्या.
वरुण चक्रवर्थी १८वे षटक फेकण्यासाठी आला अन् आशुतोषने त्याला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू सरळ सुनील नरीनच्या हातात गेला आणि आशुतोषला ७ धावेवर माघारी जावे लागले. मिचेल स्टार्कला गोल्डन डकवर पाठवून वरुणने सलग दोन चेंडूंवर दोन धक्के दिले. विपराजने १९व्या षटकात ४, ६, २ असे फटकेबाजी करून दिल्लीला शर्यतीत ठेवले. ६ चेंडूंत २५ धावा करायच्या होत्या आणि दुष्मंथा चमीरा स्ट्राईकवर होता.
आंद्रे रसेलच्या पहिल्या चेंडूवर एक धाव काढून चमीराने विपराजला स्ट्राईक दिली आणि त्याने सलग दोन चौकार खेचून रंगत ठेवली होती. २ चेंडूंत १४ धावा अशी परिस्थिती आल्याने सामना कोलकाताच्या पारड्यात झुकला. विपराज पाचव्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारताना त्रिफळाचीत झाला. त्याने १९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा केल्या. DC ला ९ बाद १९० धावांवर समाधान मानावे लागले आणि KKR ने १४ धावांनी मॅच जिंकली.
तत्पूर्वी, KKRने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २०४ धावा केल्या. सुनील नरीन( २७), रहमतुल्लाह गुरबाज ( २६), अजिंक्य रहाणे ( २६) यांची चांगली सुरुवात केली. वेंकटेश अय्यर ( ७) पुन्हा अपयशी ठरला असला तरी अंगकृष रघुवंशी ( ४४) व रिंकू सिंग ( ३६) यांचा फॉर्म परतणे संघासाठी शुभसंकेत आहे. या जोडीने ६० धावांची भागीदारी केली. आंद्रे रसेलच्या १७ धावांनी संघाला दोनशेपार पोहोचवले.
IPL 2025 Point Table
दिल्लीला आजच्या पराभवामुळे १० सामन्यांत १२ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधानी रहावे लागले, तर कोलकाता ९ गुणांसह सातव्या क्रमांकावर राहून प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून आहेत. दिल्लीला चार सामन्यांत आता किमान ३ विजय मिळवावे लागणार आहेत. यापैकी तीन सामने त्यांना प्रतिस्पर्धी संघांच्या घरी खेळायचे आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे.