पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून भारताच्या हल्ल्याच्या भीतीने घाबरला आहे. त्यातच देशातंर्गत सध्या गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याने सरकार घाबरले आहे. भारत सरकारने सिंधू पाणी करार अंशत: स्थगित केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानातील चार प्रांतांमधील सिंध राज्यातील जनता केंद्र आणि लष्कराविरोधात रस्त्यावर उतरली आहे. येथील लोकांनी आपल्याच लष्कराला आणि शरिफ सरकारला शिव्यांची लाखोली वाहिली आहे.
या योजनेने अंतर्गत वाद
सिंध राज्यात बांधल्या जाणाऱ्या 6 कालव्यांच्या वादग्रस्त योजनेबद्दल असंतोष पसरला आहे. ‘ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव’ अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. सिंधचे लोक या योजनेला तीव्र विरोध करत आहेत. पंजाब आणि लष्कराची ही लूट योजना असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाढता दबाव लक्षात घेत सरकारने ही योजनाच गुंडाळली आहे. पण तरीही जनता मात्र काही रस्त्यावरून बाजूला हटायला तयार नाही. दोन प्रांतातील भेदभाव हे त्यामागील खरं कारण असल्याचे सांगितले जाते.
ट्रकच्या लांबच लांब रांगा
गेल्या 12 दिवसांपासून सिंध प्रांतातील लोक या योजनेला विरोध करत आहेत. लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. व्यापार ठप्प आहे. पंजाब राज्याकडे जाणारे महामार्ग बंद झाले आहेत. कराची पोर्टला देशभरातून सामान पाठवणारे ट्रक या रस्त्यावर अडकून पडले आहेत. ट्रकच्या लांबच लांब रांगा आहेत. जवळपास एक लाख ड्रायव्हर आणि हेल्पर अडकून पडले आहेत.
कालव्याची ही योजना ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिवचा (GPI) भाग आहे. त्यासाठी जवळपास 3.3 अब्ज डॉलर इतका खर्च आहे. या योजनेच्या माध्यमातून पंजाब, सिंध आणि बलूचिस्तानमधील 48 लाख एकर नापीक जमीन सुपीक करण्याची ही योजना आहे. ही जमीन आपल्या गोवा राज्यापेक्षा आठ पट मोठी आहे. 2023 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी या योजनेची कोनशिला ठेवली होती.
सिंधमधील लोकांना चिंता
लष्कराच्या एका खासगी कंपनीकडे ही योजना सोपवण्यात आली होती. सध्या भारताने सिंधु पाणी करार योजनेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला पाणी कमी मिळत आहे. त्यातच हिवाळ्यापर्यंत 45 टक्के पाणी कपात होण्याची भीती वाटत आहे. कालव्यांच्या योजनेमुळे समुद्रातील पाणी सुद्धा या कालव्यात मिसळण्याची भीती आहे. त्यामुळे जमीन क्षारयुक्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतातील नेत्यांचे वर्चस्व दिसून येते. ते म्हणतील ती उजवी दिशा असे गणित आहे. हे पण या अंसतोषाचे एक कारण आहे. आता येथील जनतेने 5 मे रोजी मोठे आंदोलन करण्याचा आणि 11 मे रोजी रेल्वे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.