Sindhudurg : अन्यायकारक बोधगया मंदिर कायदा रद्द करा; भिक्खू संघाचे आंदोलन, सिंधुदुर्गनगरीत दि बुद्धिस्ट फेडरेशनतर्फ मोर्चा
esakal April 29, 2025 06:45 PM

सिंधुदुर्गनगरीः अन्यायकारक बोधगया मंदिर कायदा १९४९ रद्द करावा, महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी भिक्खू संघाचे गेले वर्षभर देशभरात आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्ह्यातील बौद्धांच्या विविध संघटना एकत्र येत दि बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. या मोर्चात बहुसंख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते.

बिहारमध्ये जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगया आहे. ते बौद्ध धर्माच्या चार पवित्र स्थळांपैकी एक आहे. जिथे भगवान बुद्धांना दुःखमुक्तीचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले. बोधगया येथील महाबोधी महावीहार हे भारतासह जगभरातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. मात्र, यावर कब्जा केल्याचा आरोप आहे. ते बौद्धांच्या ताब्यात मिळावे, यासाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. या सुरू असलेल्या बौद्ध भिक्खूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दी बुद्धिस्ट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्यातील विविध संघटना एकवटल्या असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी विविध बौद्ध संघटनाचे जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. त्यामध्ये आनंद कासार्डेकर, विद्याधर कदम, मधुकर तळवणेकर, संदीप कदम, अंकुश कदम, शामसुंदर जाधव, रवींद्र पवार, सुषमा हरकुळकर, शारदा कांबळे, अंजली कदम, श्रद्धा कदम, अंकुश जाधव यांच्यासह भंते सचित बोधी, भंते प्रज्ञावंत, भंते अश्वजीत आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील बौद्ध बांधव एकत्रितरित्या लढा देतील, असा इशारा दिला. आपल्या मागण्यांचे निवेदन बिहारचे मुख्यमंत्री, राष्ट्रपतींना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले.

पोलिसांचा बंदोबस्त
दि बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली आयोजित मोर्चासाठी सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात होता. अतिशय शांततेत व शिस्तबद्धरित्या आलेल्या या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन या ठिकाणी अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडत जमलेल्या बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.