पहिल्या एपिसोडनंतर आले तेरा फोन आणि तेजश्रीचा सल्ला ; 'होणार सून..' फेम कलाने सांगितला भन्नाट अनुभव
esakal April 29, 2025 06:45 PM

Marathi Entertainment News : आजवर मराठी मलिकविश्वात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. त्यातीलच एक म्हणजे होणार सून मी या घरची. सहा सासवा असलेल्या जान्हवीची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळाली. यातील काहीही हा श्री डायलॉग लोकप्रिय ठरलाच तर शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान ही जोडी सुपरहिट झाली. नुकतंच या मालिकेत जान्हवीच्या सावत्र आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने तिचा अनुभव शेअर केला आणि तेजश्रीने दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं.

होणार असून मी ह्या घरची मालिकेत अभिनेत्री आशा शेलार यांनी जान्हवीच्या सावत्र आईची कलाची भूमिका साकारली. सावत्र मुलीवर राग असलेली आणि गोड बोलून तिच्याकडून फायदा करून घेणार कला त्याकाळात सुपरहिट झाली. ही भूमिका अभिनेत्री आशा शेलार यांनी साकारली होती. त्यांना ही मालिका कशी मिळाली आणि तेजश्रीने त्यांना काय सल्ला दिला हे त्यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केलं.

आशा म्हणाल्या की,"गुंतता हृदय हे ही मालिका लोकप्रिय ठरल्यानंतर मी ब्रेक घेतला. त्यानंतर मी माझ्या बँकेच्या नोकरीमध्ये व्यस्त होते. त्यावेळी मी गोरेगाव ब्रँचमध्ये काम करत होते आणि मंदार देवस्थळी मला भेटायला आला. त्याने त्याचं माझ्याकडे काम असल्याचं सांगितलं आणि माझं कब्बडी नाटकातील काम पाहिलं असल्याचं त्याने म्हटलं. त्यानंतर तो म्हणाला मी एक मालिका करतोय. त्यात एक भूमिका तुमच्यासाठी माझ्याकडे आहे. पण मला त्या भूमिकेत तुम्हाला फार रिझवायचं नाहीये. कारण त्याला माझ्या बँकेच्या नोकरीबद्दल माहित होतं. एक मुलगी आणि तिला सहा सासवा आहेत आणि त्यांची गोष्ट या मालिकेत आहेत. म्हणजे ती सून आणि सासवांच्या गंमतीजमती पाहायला मिळतील. पण तुम्हाला तिच्या सावत्र आईची भूमिका करायची आहे पण ती फार काळ नसणार. कारण मुलीचं लग्न झालं की तिच्या माहेरचं काही फार दाखवलं जात नाही. मी होकार दिला. "

"मालिकेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 13 जूनला काहीतरी तिचा पहिला एपिसोड प्रसारित झाला. त्या दिवशी मालिकेनंतर मला धडाधड एवढे फोन आले. पहिलाच सीन पाय दुखतायत, बसलेली आहे आणि पहिलाच डायलॉग "काय आजतरी चहा मिळणार आहे का?" तो संवाद ऐकून अनेकांना वाटलं हे काहीतरी वेगळं आहे. अशी वेगळी आई असू शकते ना. ती बिचारी मुलगी तुळशीला पाणी घालतेय आणि या आईची बडबड सुरूच आहे. प्रत्येक आई-मुलीचं नातं वेगळं असूच शकत. सगळ्याच आई मुलींशी प्रत्येकवेळी गोड वागत नाही. तो सीन झाल्यानंतर मला धडाधड तेरा फोन आले. प्रत्येकाला काम आवडला होतं.

त्यावेळी मधुगंधा त्या मालिकेचं लिखाण करत होती. ती म्हणाली "आशाताई तुम्ही मला खूप आवडलेला आहात. बघा आता मी काय करते." त्यानंतर ती लिहायला लागली असं. मी तिला म्हटलं "अगं मी थकते" ती म्हणाली की "काय करणार ? आम्हाला चॅनेलमधूनच सांगितलं आहे की काहीही झालं तरी कला बोलणारच." पुढे ते लोकांना आवडू लागलं."

"खरं सांगायचं तर मला ही मालिका किती प्रसिद्ध झालीये हे मला माहीतच नव्हतं. मी सोशल मीडियावर नव्हते आणि वापरतही नव्हते. मला तेजू बऱ्याचदा सांगायची की आशाताई तुला माहितीये का ? तुझा एक फॅन क्लब आहे. पण मी ते पाहिलंच नव्हतं. त्यावर सगळेचजण म्हणायचे या बाई भन्नाट आहेत. खूपच छान करायचे. ती मला एवढं सांगायची तरीही मी कधी ते उघडून बघितलं नाही. कारण माझ्याकडे वेळच नव्हता कारण मी मालिकेत काम करायचे, तिथून ऑफिस त्याचदरम्यान माझ्या नवऱ्याचं आजारपण सुरु झालं होतं. त्यामुळे हॉस्पिटलला मी नाईट शिफ्ट करायचे. त्यानंतर शूटिंग असेल तर तिथे जायचे आणि नंतर ऑफिसमध्ये जायचं.

सोशल मीडियामुळे मला गोष्टी कळत नसला तरीही बँकेत येणारे जे लोक असले तरीही ते कधी बोलायचे नाहीत. कारण थोडे त्या भूमिकेमुळे बोलायला घाबरायचे." असं त्या पुढे म्हणाल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.