IPL स्पर्धेदरम्यान पृथ्वी शॉला मिळाली गुड न्यूज, या टीमकडून खेळण्याची संधी
GH News April 30, 2025 02:06 AM

पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकि‍र्दीला उतरती कला लागली आहे. कारण टीम इंडियात संधी मिळेल असं वाटत नाही. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेतही त्याला संघात घेण्यास कोणीही रूची दाखवली नाही. दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केल्यानंतर त्याच्यासाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्यामुळे पृथ्वी शॉच्या पदरी निराशा पडली आहे. पृथ्वी शॉचं संपूर्ण पर्व वाया गेलं आहे. असं असताना टी20 मुंबई लीग 2025 स्पर्धेसाठी आठ आयकॉन खेळाडूंची निवड केली आहे. या लीग स्पर्धेत पृथ्वी शॉ एक महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. त्याच्यासह अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकुर आणि सर्फराज खान यांची आयकॉन म्हणून निवड झाली आहे.टी20 मुंबई लीग 2025 स्पर्धा 26 मे ते 8 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले की, ‘देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईला अभिमान वाटणारे 8 महान खेळाडूंना संघात समाविष्ट करताना आम्हाला आनंद होत आहे. हे खेळाडू मुंबई क्रिकेटच्या परंपरा, कठोर परिश्रम आणि यशाचे प्रतीक आहेत.’

‘या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे तरुण खेळाडूंना शिकण्याची आणि प्रेरणा घेण्याची संधी मिळेल. आम्ही भारतातील भविष्यातील खेळाडू ओळखण्यासाठी आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहोत. या स्टार खेळाडूंची लीगमधील उपस्थिती त्याच्या पातळीला पुढील स्तरावर घेऊन जाईल आणि प्रेक्षकांना एक संस्मरणीय अनुभव देईल.’, असंही अजिंक्य नाईक यांनी पुढे सांगितलं. पृथ्वी शॉला क्रिकेटमध्ये सुरुवात करण्यासाठी पुन्हा नवी संधी मिळणार आहे. पृथ्वी शॉला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी चालून आली होती. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर गेला. त्याच्या जागी निवड होईल असं वाटत होतं. पण संघाने तरुण आयुष म्हात्रेवर विश्वास टाकला.

या स्पर्धेत 8 संघ सहभागी होतील आणि सर्व सामने वानखेडे स्टेडियमवर खेळवले जातील. नॉर्थ मुंबई पँथर्स, एआरसीएस अंधेरी, ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट, नमो बांद्रा ब्लास्टर्स, ईगल ठाणे स्ट्राइकर्स, आकाश टाइगर्स मुंबई वेस्टर्न सबअर्ब्स, सोबो मुंबई फाल्कन्स आणि मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स अशी स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची नावं आहेत. या लीग स्पर्धेत सर्वांच्या नजरा या पृथ्वी शॉकडे असणार आहेत. कारण त्याने या लीग स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर त्याच्या करिअरला पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. पण सध्या तरी पृथ्वी शॉला टीम इंडियात संधी मिळणं कठीण आहे. कारण बरीच यादी प्रतीक्षेत आहेत. फॉर्मात असलेल्या खेळाडूंना संधी मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे पृथ्वी शॉला या लीग स्पर्धेपासून चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.