- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
‘The brain is wider than sky.’
- Emily Dickinson .
एक कुतूहल मृत्यूमुखी पडल्याने काय काय होते? प्रश्न संपतात. नव नवोन्मेषाचे जे धुमारे फुटायला हवेत, त्यांचे बालपणातच खच्चीकरण होते. याउलट प्रश्न विचारायला उद्युक्त केले पाहिजे. तसे वातावरण केजी ते पीजी अशा वर्गावर्गात निर्माण व्हायला हवेत.
मला एका तिबेटियन शिक्षकाची गोष्ट आठवते. तिबेटमध्ये गणिताचा शिक्षक होता. तो दरवर्षी नव्या वर्गाला शिकवण्याची सुरुवात करण्याआधी फळ्यावर दोन आकडे काढायचा. ४ आणि २. मग मुलांना विचारायचा, उत्तर काय आहे? उत्साही हात वर व्हायचे. काहीजण सांगायचे, उत्तर आहे दोन. चार वजा दोन बरोबर दोन किंवा चार भागिले दोन बरोबर दोन.
शिक्षक नाही म्हणायचा.
काही मुलं म्हणायची, सहा. चार अधिक दोन बरोबर सहा.
शिक्षक पुन्हा नाही म्हणायचा.
मग काही मुलं म्हणायची, आठ. चार गुणिले दोन बरोबर आठ.
शिक्षक तरीही नकारार्थी मान हलवायचा.
मुलं म्हणायची, हे चीटिंग आहे. दोन संख्यांच्या बाबतीत आम्ही जे शिकलो ते सगळं करून दाखवलं, तरी एकही उत्तर का बरोबर नाही?
शिक्षक म्हणायचा, मी तुम्हाला विचारलं, उत्तर काय आहे? एकानेही मला हे का विचारलं नाही की प्रश्न काय आहे? तुम्ही उत्तरं कसे देऊ लागता धडाधड?
असे कल्पक शिक्षक असतील तर, विद्यार्थ्यांच्या मेंदूतील उजव्या भागाला चालना मिळेल. तेथील मज्जापेशी जिवंत राहतील. मेंदू ताजातवाना तरतरीत राहील. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नवनवीन शोध लागतील. पालकांनीही आपापल्या मुलांच्या बाबतीत वेगवेगळे विचार केले पाहिजेत. उत्तम संस्कार हे लहानपणापासून केले पाहिजे. उत्तुंग कार्याने आपापली मुले जगाला ललांभूत व्हावी असे वाटत असेल तर, त्यांच्या कल्पनांना, प्रश्नांना न अडवणेच श्रेयस्कर. स्वतःला उत्तरे माहिती नसतील तर ज्यांना उत्तरे माहिती असतील ते स्रोत शोधावे लागतील.
आमच्या एका ट्रेनरने एक कोडे विचारले, एक वर्तुळ काढा. वर्तुळात लिहा अक्षरे A, E, F आणि वर्तुळाबाहेर B, C, D. आम्ही तशी आकृती काढली. मग ट्रेनरने विचारले, उर्वरित अल्फाबेट्सपैकी कोणते अक्षर वर्तुळात असेल आणि कोणते बाहेर? तार्किक कारणमिमांसेसह उत्तर हवे हं!
अशी अनेक कोडी गुगलने शोधता येतील. उजवा मेंदू जास्त कार्यरत राहील. नवनवीन यशाच्या वाटा धुंडाळाव्या अशा प्रेरणा मिळत राहतील. आपला मेंदू अफाट क्षमतेचा आहे याची वारंवार खात्री पटत राहील. संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेने आपल्या मेंदूचा ताबा घेऊ नये असे वाटत असेल तर, प्रचंड क्षमतेच्या आपल्याच मेंदूला वारंवार चालना द्यावी लागणार आहे. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात घट्ट पाय रोवून उभे रहायचे असेल स्वतःच्याच मेंदूच्या वारंवार प्रेमात पडावे लागणार आहे. त्यासाठी प्रतीकात्मकरीत्या रोज हात उंचावून म्हणूयात, ‘माझे माझ्यावर अत्यंत प्रेम आहे!’ आणि स्वतःलाच रोज मिठीत घेऊया. खूप सुंदर दृश्य असते ते. बघा आरशात.