(महाराष्ट्र दिन विशेष)
गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. ३० : ‘‘शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिभशंभूचं गातो गुणगान जी..जी...’’ अशा खणखणीत आवाजात वीरांच्या पराक्रमाचा इतिहास उभा करताना करताना शाहिरांची डफावर थाप पडताच मराठी माणसाच्या अंगात वीरश्री निर्माण होते. हीच महाराष्ट्राची वैभवशाली पोवाडा लोककला जपण्याचा ध्यास मावळातील शिवउर्जा कलामंचाचे शिवशाहीर मंगेश साळुंके आणि शिवशाहीर बजरंग रंदवे यांनी घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आणि क्रांतिवीरांचा कार्यगौरव करण्यासाठी पोवाडे रचले आणि गायले गेले. यासह साक्षरता, महिला सक्षमीकरण, समाजप्रबोधन आदी विषयांवर जागरूकता निर्माण करण्यासाठीही पोवाडे लिहिले गेले. आजकाल डीजे आणि रॅपच्या काळातील नव्या पिढीला या पोवाडा लोककलेचा विसर पडलेला दिसतो. आजमितीला महाराष्ट्रात जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच शाहीर पोवाड्यांचा वारसा पुढे नेताना दिसतात. लोकाश्रय अथवा राजाश्रय मिळत नसल्याने बहुतेक शाहिरांची आर्थिक परिस्थिती हालाखीची जाणवते. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील नवयुवकांनी शिवऊर्जा कलामंचाद्वारे पोवाडा लोककलेचा ध्यास घेतला आहे.
छत्रपती शिवरायांच्या प्रती असलेली श्रद्धा, दुर्ग संवर्धन मोहिमा, शिव महानाट्य उपक्रमाच्या माध्यमातून कार्यरत असलेले मंगेश साळुंके आणि बजरंग रंदवे यांच्या मनात पोवाडा लोककलेविषयी आवड निर्माण झाली. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, शाहीर पिराजीराव सरनाईक, शाहीर विठ्ठल उमाप आदींपासून प्रेरणा घेत पोवाडा लोककलेचा प्रचार कारण्याहेतूने त्यांनी शिवऊर्जा कलामंच स्थापन केला. सुरवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून पोवाडा सादर केल्यानंतर हळूहळू त्यांना सार्वजनिक कार्यक्रमाची निमंत्रणे मिळू लागली. पथकाचे प्रमुख शिवशाहीर मंगेश साळुंके आणि बजरंग रंदवे यांच्या नेतृत्वाखाली बालशाहीर स्वरांग साळुंके, वेदाक्ष साळुंके, तेजस देशमुख, शिवकन्या श्रेया साळुंके, निता साळुंके, रियांशा साळुंके आणि ढोलकीवादक दादा वाघमारे, गोरख कोकाटे, हार्मोनियम वादक विभाजक कांबळे, निवेदक शुभम खेडेकर आणि सहकलाकारांचे पथक संयुक्तपणे पोवाडा सादर करते. या पथकाला अजूनही शहरी भागातून प्रतिसादाची अपेक्षा आहे.
महापुरुषांच्या पोवाड्यांसोबतच गडकिल्ले संवर्धन, नद्यांची स्वच्छता, जल बचत, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर जनजागृती आणि प्रबोधनात्मक पोवाडेदेखील हे कलावंत सादर करतात.
शाहिरी कलाकारांना जनजागृती कार्यक्रमात शासनाने सहभागी करुन त्यांना योग्य ते मानधन देणे गरजेचे आहे. पोवाडा लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय शाहिरी पुरस्कार स्पर्धा घ्यावी. प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत.
-मंगेश साळुंके, शिवशाहीर, तळेगाव दाभाडे
पोवाड्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास नव्या पिढीला कळावा, या उद्देशाने शाहिरांची कदर केली जावी. शाहिरांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळणे गरजेचे आहे.
- बजरंग रंधवे, शिवशाहीर, तळेगाव दाभाडे