किन्हवली पोलिसांनी उभारले अभ्यागत कक्ष
किन्हवली, ता. ३० (बातमीदार) ः ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिस ठाण्यातील अभ्यागत कक्षाची उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच अपर पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली सध्या प्रत्येक पोलिस ठाण्यात अभ्यागत कक्ष उभारण्याचे काम सुरू आहे. ठाणे ग्रामीण भागातील सर्वात प्रथम उभारलेल्या शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिस ठाण्याच्या अभ्यागत कक्षाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या वेळी शहापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे हे उपस्थित होते.
अभ्यागत कक्ष पोलिस ठाण्यातील एक महत्त्वाचे अंग आहे. ते नागरिकांसाठी संवाद, माहिती आणि मदतीचे केंद्र म्हणून उपयोगात आणता येते, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे राखता येते. एकूण ६२६ चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रफळ असलेल्या किन्हवली पोलिस ठाण्यात आदिवासी दुर्गम भागातील अनेक नागरिक तक्रारी किंवा अन्य प्रकारच्या कामकाजासाठी सतत येत असतात. दरम्यान, मोठे गुन्हे नोंदणीचे काम तासनतास चालते. अशा वेळेला अनेक नागरिकांना ताटकळत राहावे लागते, म्हणून त्यांच्यासाठी अद्ययावत असे अभ्यागत कक्ष उभारले जात आहे. ठाणे ग्रामीण भागातील किन्हवली पोलिस ठाण्यातील हे पहिलेच अभ्यागत कक्ष उभारण्यात आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी किन्हवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खैरनार व सर्व स्टाफचे कौतुक केले.