पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द करत कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. आता बुधवारी भारताने NOTAM जारी करत पाकिस्तानमधून येणाऱ्या विमानांना भारताच्या हवाई क्षेत्रात बंदी घातलीय. यामुळे कोणत्याही पाकिस्तानी विमानाला भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करता येणार नाही.
भारताने पाकिस्तानात नोंदणी केलेल्या, पाकिस्तानकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडे तत्वाने घेतलेल्या विमानांसाठी, तसंच एअर लाइन्स आणि लष्करी उड्डाणांसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद केलंय. ३० एप्रिल ते २३ मे २०२५ पर्यंत कोणत्याही पाकिस्तानी विमानाला भारताच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
भारताने हवाई क्षेत्र बंद करण्याआधी पाकिस्तानने त्यांच्या नॅशनल एअरलाइन्सने गिलगिट, स्कार्दू आणि पाकव्याप्त काश्मीरपर्यंतची उड्डाणं रद्द केली होती. पीआयएने कराची आणि लाहोरहून स्कार्दूपर्यंतची दोन दोन उड्डाणे रद्द केली होती. पाकिस्तानही त्यांच्या एअरस्पेसमध्ये करडी नजर ठेवून आहे.
सर्व व्यावसायिक उड्डाणं सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आली आहेत. हे सगळे निर्णय खबरदारी म्हणून घेण्यात आले आहेत. दोन्ही देशांमधला तणाव आणि राष्ट्रीय हवाई हद्द सुरक्षित ठेवण्यासाठी असा निर्णय़ घेतला गेलाय.