ओरोस - जिल्हास्तर गुंतवणूक परिषदेमध्ये आज एकूण ३० उद्योजकांनी गुंतवणुकीची तयारी दर्शविली. त्यातील २२ सामंजस्य करारही झाले. त्यातील १७ जणांना करारपत्रे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते देण्यात आले. यातून एकूण ६३५ कोटींची गुंतवणूक होणार आहे. सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन सभागृहात जिल्हा उद्योग केंद्रातर्फे एकदिवसीय जिल्हास्तर गुंतवणूक परिषद झाली.
त्यात पालकमंत्री राणे म्हणाले, ‘राज्य सरकार चांगले काम करेल त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वाटा असणार आहे. विकास प्रकल्प, विविध उद्योग, पर्यटन आणि कृषी विकास या सर्वांमध्ये सिंधुदुर्गचा वाटा मी हक्काने मागून आणणार आहे. सिंधुदुर्ग उद्योजकांसाठी पोषक वातावरण असलेला जिल्हा आहे. येथे अधिकाधिक सुविधा देऊ. त्यामुळे देशभरातील उद्योजक सिंधुदुर्गातच गुंतवणूक करतील, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
ते म्हणाले, ‘आज झालेले सामंजस्य करार, गुंतवणूक जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरेल. पालकमंत्री म्हणून ही परिषद आणखी मोठी करण्याचा मानस आहे. त्यात किमान ५०० करार व्हावेत. उद्योजक, गुंतवणूकदारांना नेमक्या काय सुविधा, सवलती देणार याचे सादरीकरण त्यांच्या समोर झाले पाहिजे.
गुंतवणूक करणाऱ्यांना नफा झाला पाहिजे; पण त्याचवेळी जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, असा दृष्टिकोन आहे. त्यासाठी पोषक वातावरण देऊ.’’
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले उपस्थित होते.
मोठ्या उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
गेल्या आठवड्यात मोठ्या उद्योजकांचे प्रतिनिधी मला भेटायला आले होते. त्यांनी काही माहिती माझ्याकडून मागितली. त्यांनाही काही उद्योग उभे करायचे आहेत. चांगले रस्ते, वीज, नेटवर्क देण्यावर भर आहे. चिपी विमानतळावर चार महिन्यांत नाईट लँडिंगची सुविधा सुरू होत आहे.
पुढील वर्षीच्या फिल्म फेअर अॅवॉर्डसारखे कार्यक्रम जिल्ह्यात होण्यासाठी मी केलेल्या विनंतीला मान्यता मिळाली आहे. यामुळे पर्यटन वाढणार आहे. आम्ही ‘सिंधुदुर्ग प्रथम’ अशी थीम तयार केली आहे. सिंधुदुर्गला गुंतवणूक, रोजगार, पर्यटन, कृषी आदींसह प्रत्येक बाबतीत अग्रेसर ठेवण्याचा निश्चय पुढील पाच वर्षांमध्ये प्रत्यक्षात येईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.