अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये एका भारतीय वंशाच्या सीईओने पत्नी आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गोळी झाडून घेत जीवन संपवलं. म्हैसूरमधील टेक उद्योजक आणि होलोवर्ल्डचे सीईओ हर्षवर्धन किक्केरी यांनी पत्नी श्वेता पन्याम आणि मुलगा ध्रुव किक्केरी यांची हत्या केली. २४ एप्रिलला ही घटना घडली. न्यूकॅसलमधील टाऊनहाऊस इथं घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय.
हर्षवर्धन यांनी आधी पत्नी आणि मोठ्या मुलाची हत्या केली. यावेळी त्यांचा लहान मुलगा बाहेर गेला होता त्यामुळे वाचला. दोघांच्या हत्येनंतर हर्षवर्धन यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्या हत्येचं आणि आत्महत्येचं कारण सांगितलेलं नाही. शेरिफ ऑफिसने सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अधिक तपास केला जात आहे.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन यांचं चौघांचं कुटुंब होतं. अत्यंत शांत स्वभावाचे आणि खासगी आयुष्य जपणारं असं हे कुटुंब होतं. टाउनहाऊसमध्ये राहूनही ते इतरांमध्ये फारसे मिसळत नव्हते. हर्षवर्धन यांचा ७ वर्षांचा मुलगा फक्त आता कुटुंबात जीवंत राहिला.
हर्षवर्धन किक्केरी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील होते. म्हैसूरनंतर अमेरिकेत सिराक्यूज युनिव्हर्सिटीत त्यांनी शिक्षण घेतलं होतं. मायक्रोसॉफ्टमध्ये रोबोटिक्स तज्ज्ञ म्हणून काम केलं होतं. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत काम केलं होतं.
२०१७ मध्ये भारतात येऊन त्यांनी होलोवर्ल्ड नावाची कंपनी सुरू केली होती. होलोवर्ल्ड कपंनीत हर्षवर्धन यांच्यासोबत त्यांची पत्नी श्वेता या सहसंस्थापक होत्या. कंपनीने अमेरिका, ब्रिटन, इस्रायल या देशांमध्ये त्यांची उत्पादने निर्यात केली होती. इतकंच नव्हे तर कंपनीने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून माजी क्रिकेटपटू युवराज सिंहला नियुक्त केलं होतं. पण कोरोना काळात कंपनी डबघाईला आली आणि २०२२ मध्ये बंद झाली.. त्यानंतर कुटुंब पुन्हा अमेरिकेला गेलं होतं.
हर्षवर्धन यांचे वडील नारायण किक्केरी हे भाषातज्ज्ञ होते. तर हर्षवर्धन यांचा मोठा भाऊ चेतन नुकताच अमेरिकेतून म्हैसूरला परतला होता. हर्षवर्धन यांनी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती. राष्ट्रीय सीमा सुरक्षेसाठी रोबोटिक्सच्या वापरावर त्यांनी चर्चा केली होती.