- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे शरीराच्या उष्णतेचे संतुलन बिघडण्याचा काळ. विशेषतः माध्यमवयीन स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल बदल, वाढलेली चिडचिड, थकवा, झोपेचा त्रास, पित्तविकार यांसारखे लक्षणं या उष्णतेला अधिक वाढवत असतात. मात्र, योग्य योगसाधना, विशिष्ट प्राणायाम आणि थंडावा देणाऱ्या आहाराच्या साह्याने ही समस्या निवारण करता येते.
योगासनांचा थंडावा
सुप्त बद्धकोनासन : पाठ टेकवून झोपा, पायाची टाच एकत्र ठेवा, गुडघे बाजूला सोडा. फायदे : पेल्विक भाग थंड राहतो, हार्मोनल संतुलन सुधारते, गर्भाशय व मूत्रमार्ग शांत राहतो. कधी करावे?: रात्री झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळी १० मिनिटं.
बालासन : गुडघ्यावर बसा, कपाळ जमिनीवर टेकवा, हात पुढे पसरवा. फायदे : मेंदू शांत होतो, पाचनक्रिया सुधारते, उष्णतेचा ताण कमी होतो. कधी करावे?: जेवणानंतर १ तासानं किंवा सकाळी.
पश्चिमोत्तानासन : पाय सरळ ठेवून पुढे वाका, पायाला हात लावण्याचा प्रयत्न करा. फायदे : मानसिक शांती, पचन सुधारणा, त्वचेला थंडावा. टीप : शरीरात उष्णता असताना हा योग विशेष लाभदायक.
शवासन : पाठ टेकवून झोपा, सर्व शरीर सैल करा. फायदे : संपूर्ण शरीराची उष्णता उतरते, शांत झोप येते, मानसिक रिलॅक्सेशन मिळते.
प्राणायाम : श्वासांतून थंडावा
शीतली प्राणायाम : जीभ नळीप्रमाणे बाहेर काढा, त्यातून थंड श्वास घ्या, नाकाने सोडा. फायदे : शरीराचा तापमान कमी करतो, चिडचिड शांत करतो, त्वचेला थंडावा मिळतो.
शीतकारी प्राणायाम : दात बंद ठेवून ओठ उघडे, तिथून श्वास घ्या, नाकाने सोडा. फायदे: मानसिक ताजेपणा, उष्णतेशी लढण्याची ताकद वाढते.
चंद्रभेदी प्राणायाम : डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, उजव्या नाकपुडीने सोडा. फायदे : शरीरात चंद्र (शांत) ऊर्जा वाढवते, उष्णतेचा बॅलन्स राखते.
कधी करावे? : सकाळी योगानंतर किंवा संध्याकाळी शांत वातावरणात.
आहार : थंडावा देणारी जीवनरेषा
तुळस, कोथिंबीर, मिंट : शरीरातील पित्त शमवतात
गोड ताक, तांदळाचा पेज, नारळपाणी : शरीरातील उष्णता शोषून घेतात
फळे : कलिंगड, डाळिंब, संत्री, बोरे, गाजरे (अँटिऑक्सिडंट्सने भरलेले)
साबुदाणा खीर, बेलसरबत, साळीचा भात, कोकम : पचन सुधारतो आणि थंडी वाढते
साजूक तूप : योग्य प्रमाणात घेतल्यास आतून थंडावा देते
दुपारचे जेवण : भरपूर भाजी, तांदूळ, ताक असलेले जेवण – थंड ठेवते
टाळायचे पदार्थ
अति तिखट, गरम भाज्यांचे प्रकार
मैद्याचे पदार्थ, बेकरी आयटम्स
साखरयुक्त शीतपेये
गरम, मसालेदार तेलकट पदार्थ
दिनचर्या व जीवनशैली
साधेपणा आणि सात्त्विकता
रोज २० मिनिटं प्राणायाम
आठवड्यातून ५ दिवस योग
दिवसातून १०–१५ मिनिटे एकांतात ध्यान
रात्री वेळेवर झोप, दुपारी थोडी विश्रांती
शरीराचे ऐका. थकवा आला, की विराम द्या
भावनिक उष्णता (राग, चिंता) टाळा
शेवटचा मंत्र
‘शरीर शुद्ध तर मन प्रसन्न, आणि मन शांत तर उष्णता आपोआप विरघळते.’
योग, प्राणायाम आणि योग्य आहार यांचा समन्वय साधल्यास फक्त उष्णतेवरच नव्हे, तर एकंदर जीवनशैलीवरही चांगला परिणाम होतो. म्हणून दररोज काही वेळ स्वतःसाठी काढा - कारण तुम्ही ठकी असाल तर सगळं जग सुंदर भासतं.