अ‍ॅलर्ट ऑन नेव्ही, इशारा वर कोस्ट गार्ड
Marathi May 02, 2025 10:30 AM

भारतीय लष्करही हाय अलर्टवर : अरबी समुद्रात जहाज-विमानविरोधी युद्धसराव : गुजरातजवळ तटरक्षक दल तैनात

वृत्तसंस्था/नवी दिल्ली, श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील कटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत पीडितांना न्याय मिळेल असेही आश्वस्त केले आहे. तसेच सुरक्षा दलाच्या तिन्ही विभागांना प्रतिहल्ल्याविषयी निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळे नौदल, हवाई दल, लष्कर यांच्यासह तटरक्षक दलही सज्ज झाले आहे. नौदलाकडून अरबी समुद्रात युद्धसरावाचा आढावा घेतला जात असून भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतीयांची एकता ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 8 दिवस उलटले आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयए प्रमुख सदानंद दाते गुरुवारी दुपारी पहलगामला गेल्यानंतर हल्ला झालेल्या घटनास्थळीही पोहोचले होते. गुन्हेगारांविषयीची माहिती चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी एनआयए पथकाने सदर भागाचे थ्रीडी मॅपिंग केले आहे. दहशतवादी कुठून आले आणि त्यांनी कोणत्या मार्गाने पळ काढला याबद्दल माहिती मिळवून त्यांचा ठावठिकाणा शोधला जात आहे. हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी चार ठिकाणी रेकी केली होती. बैसरण व्यतिरिक्त त्यात अरु व्हॅली, बेताब व्हॅली आणि अॅम्युझमेंट पार्क (स्थानिक उद्यान) समाविष्ट आहे. भारतीय नौदलाने युद्धनौकांना सज्ज करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अरबी समुद्रात जहाजविरोधी आणि विमानविरोधी गोळीबाराचा सराव करण्यात आला. गुजरातजवळ तटरक्षक दलदेखील तैनात करण्यात आले आहे.

क्षेपणास्त्र डागण्याचाही सराव

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 30 एप्रिल ते 3 मे दरम्यान गुजरात किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात नौदलाचे जवान सराव करणार आहे. या काळात कोणत्याही असामान्य हालचालींपासून युद्धनौकांना सतर्क ठेवण्यात आले आहे. अलिकडेच भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौकांमधून अनेक जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागून लांब पल्ल्याच्या अचूक हल्ल्यांसाठी आपली तयारी यशस्वीरित्या सिद्ध केली. आता भारतीय नौदल क्षेपणास्त्र डागण्यासह विविध सरावांमध्ये गुंतलेले आहे.

अरबी समुद्रात युद्धनौका तैनात

भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. या सरावाचा मुख्य उद्देश युद्धादरम्यान नौदलाची तयारी आणि भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्याची क्षमता दाखवणे हा आहे. अधिकृत सूत्रांनुसार, येत्या काही दिवसांत आणखी अनेक प्रात्यक्षिके आणि सरावांचे नियोजन आहे. भारतीय तटरक्षक दलाने गुजरात किनाऱ्यावरील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ जहाजे तैनात केली आहेत. नौदलासोबत अन्य यंत्रणाही एकत्रितपणे देखरेख वाढविण्यासाठी काम करत आहे.

आयएनएस सुरतचा सराव यशस्वी

भारतीय नौदलाची आयएनएस सुरत ही युद्धनौका हजीरा बेटानजीक सुसज्ज ठेवण्यात आली आहे. या युद्धनौकेने अरबी समुद्रात मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या ‘एमआर-एसएएम’ या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. एमआर-एसएएम जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांविरुद्ध आणि इतर हवाई लक्ष्यांविरुद्ध अत्यंत प्रभावी आहे. भारतीय नौदलाच्या नवीन स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रनाशक आयएनएस सुरतने समुद्रातील लक्ष्यावर अचूक हल्ला करण्याचा सराव यशस्वीरित्या पार पाडला. ही चाचणी आपल्या संरक्षण क्षमता मजबूत करण्यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे भारतीय नौदलाने ‘एक्स’वर म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.