इस्लामाबाद : आगामी ३६ ते ४८ तासांमध्ये पाकिस्तानवर लष्करी हल्ला करण्याचे भारताचे नियोजन असल्याची विश्वसनीय गोपनीय माहिती मिळाल्याचा दावा पाकिस्तानने आज केला. भारताने केलेल्या नाकाबंदीमुळे हैराण झालेल्या आणि हल्ल्याच्या भीतीने अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानने इशारा देत असल्याचा आव मात्र आणला आहे.
भारताने हल्ला केल्यास त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. २२ एप्रिलला झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकांमागून बैठका घेत परिस्थितीचा आढावा घेत काही निर्णयही घेतले.
हल्ल्यातील दोषींना पाताळातूनही शोधून काढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची आणि सरसेनाध्यक्षांची बैठक घेत त्यांना कारवाईसाठी मोकळीक दिली. हल्ल्याची वेळ, पद्धत आणि लक्ष्य लष्करानेच निश्चित करावे, सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल, असे मोदी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने एक निवेदन प्रसिद्ध करत भारताकडून हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली.
‘‘आधारहिन आणि रचलेल्या आरोपांच्या आधारावर भारत सरकार पाकिस्तानवर हल्ला करण्याचे नियोजन करत आहे. पाकिस्तान हा स्वत:च दहशतवादाला बळी पडलेला देश असून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा आम्ही वारंवार निषेध केला आहे.
पहलगाम हल्ल्याची तटस्थ आयोगामार्फत पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. भारताने मात्र चौकशीला बगल देत वादाचा मार्ग स्वीकारला आहे,’’ असे पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी निवेदनात म्हटले आहे. भारताने कोणतेही लष्करी धाडस दाखविल्यास तोडीस तोड प्रत्युत्तर देऊ, यावेळी सर्व जगाने या घडामोडींवर लक्ष द्यावे, असेही तरार यांनी म्हटले आहे.
ब्रिटन-अमेरिकेचे शांततेचे आवाहनलंडन/वॉशिंग्टन : भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन आणि अमेरिकेने संयम बाळगत शांतता कायम राखण्याचे आवाहन दोन्ही देशांना केले आहे. ब्रिटिश संसदेतील सत्रात पहलगाम हल्ल्याचा निषेध करतानाच, या हल्ल्यातील दोषींना कठोर शासन करण्यात भारताला मदत करण्याची ब्रिटन सरकारची भूमिका असल्याचे खासदार हमीश फाल्कनर यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून त्याचा परिणाम म्हणून भारतीयांच्या आंदोलनाच्या स्वरूपात लंडनमधील रस्त्यांवरही पाहायला मिळत आहे. तरीही दोन्ही देशांनी संयम बाळगून चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन फाल्कनर यांनी केले आहे. तणाव न वाढण्याची काळजी दोन्ही देशांनी घ्यावी, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी एक-दोन दिवसांतच बोलतील, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.