मे महिना म्हणजे मालिकांची मेजवानी होय. सध्या अनेक मालिकांमध्ये भन्नाट ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अशात आता 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेचे अपडेट समोर आले आहेत. 'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) मालिका मैत्रीवर आधारित आहे. यात पिंगा गर्ल्स आयुष्यात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जातात हे पाहणे मनोरंजक ठरते. या मालिकेला प्रेक्षकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. ज्याची सुरूवात अक्षय तृतीयापासून झाली आहे.
'पिंगा गं पोरी ' मालिकेमध्ये मिठूवर झालेल्या हल्ल्याची केस सध्या निर्णायक टप्प्यावर आहे. वल्लरीच्या प्रयत्नांमुळे श्वेताला जामीन मिळाला असला तरी खरी लढाई आता सुरू होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये वल्लरी शपथ घेताना दिसत आहे की, "आता श्वेताताईंची निर्दोष सुटका करणार ॲड. मनोज भांबरे." वल्लरीच्या या लढ्यात तिला मनोज आणि पिंगा गर्ल्सची साथ मिळणार पण ती ही केस कशी जिंकणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
मिठूवर झालेल्या हल्ल्याचे गूढ अजूनही उलगडलेले नाही. हल्लेखोराचा शोध घेणे आणि त्याच्या विरोधात ठोस पुरावे मिळवणे हे वल्लरी समोरचे प्रमुख ध्येय आहे. मात्र या लढ्यात तिला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागतंय. मग ते मनोजचा प्रतिकार असो किंवा युवराजचे गूढ मनसुबे. वल्लरी गावी जाणार असल्याने तेजा नाराज झाली आहे. तरी पिंगा गर्ल्समधील आणि एकमेकांवरील विश्वास याचे बळ वल्लरीला मिळणार आहे.
खचलेल्या श्वेताला दिलेला धीर आणि प्रेरणाला मिठूची काळजी घेण्याची विनंती वल्लरी करताना दिसते. अक्षय तृतीयापासून वल्लरीचा नवीन लढा सुरू झाला आहे. सत्याच्या शोधाचा, मिठूला न्याय मिळवून देण्याचा आणि मैत्रीचे मोल सिद्ध करण्याच्या या लढ्यात वल्लरीला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.