सायना नेहवालचा जन्म 17 मार्च 1990 रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यात झाला. तिचे वडील कृषी शास्त्रात पीएच.डी.आहे आणि आई राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू आहे. तिचे आई-वडील दोघेही राज्यस्तरीय बॅडमिंटन विजेते होते. सायनाचे बालपण हरियाणात गेले. आणि नंतर तिचे कुटुंब तिच्या वडिलांच्या बदलीमुळे हैदराबादला गेले. सायनाने वयाच्या आठव्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरूवात केली. आई बडमिंटन खेळाडू असल्याने व राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळाडू बनण्याचे आईचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने सायनाने बॅडमिंटन खेळातच करियर करायचे व राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळायचे ठरवले. तिच्या या निर्णयाला घरच्यांकडूनही उत्तम पाठिंबा मिळाला. सायनाने आधी आंध्र प्रदेशच्या स्पोर्ट्स अकादमीतून प्रशिक्षण घेतले आणि नंतर हैदराबाद येथील पुल्लेला गोपीचंद अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. बॅडमिंटन शिवाय तिला कराटेमध्ये ब्राऊन बेल्ट आहे.
सन 2006 मध्ये ती 19 वर्षांखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनली. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन अंतर्गत (BWF) वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय आहे, तसेच BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकणारीही ती एकमेव भारतीय आहे. वयाच्या 16 व्या वर्षी फिलिपिन्स ओपन मधील 4 स्टार स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला आणि सर्वात तरुण आशियाई होण्याचा मानही तिला मिळाला आहे. सायना नेहवाल हिला तिच्या उत्कृष्ट खेळासाठी भारत सरकारकडून 2009 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2010 मध्ये खेळातील अत्यंत मानाचा समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार तसेच 2016 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2018 मध्ये तिने आपला मित्र व बॅडमिंटन खेळाडू असलेल्या पी. कश्यपसोबत लग्नगाठ बांधली. सायना नेहवालने 29 जानेवारी 2020 रोजी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. तिने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपासाठी ‘स्टार प्रचारक’ म्हणून काम केले.
आपल्या आईने पाहिलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळण्याचे स्वप्न तिने पूर्ण तर केलेच पण त्याचबरोबरीने अनेक विक्रमही स्वत:च्या नावावर नोंदवण्यात ती यशस्वी ठरली. तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगे आणि अनुकरणीय आहेत.
हेही वाचा : Health Tips : या लोकांनी खाऊ नये आंबा
संपादित – तनवी गुडे