मानकापूर : मध्यप्रदेश, छत्तीसगड व बिहारसारख्या मागासलेल्या राज्यांमध्ये उदरनिर्वाहाची फारशी साधने नसल्याने तेथील गरीब, मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी सध्या नागपुरात स्थलांतरित झाले आहेत. असेच काहीसे विदारक चित्र मानकापुरातील ठिय्यावर दिसले. येथे अनेक मजूर महिला भर उन्हात तासनतास प्रतीक्षा करून दोनवेळची भाकरीची सोय करीत आहेत.
आजच्या घडीला शहरात जागोजागी मजुरांचे ठिय्ये आहेत. मानकापूर त्यापैकीच एक. हाताला काम मिळेल, या अपेक्षेने घरदार सोडून परराज्यातील अनेक पुरुष व महिला मजूर काही वर्षांपूर्वी नागपुरात आले. आजूबाजूच्या झोपडपट्टीत वास्तव्य करून मिळेल ते काम करीत आहेत. काही जण विशेषतः पुरुष मंडळी रस्त्यांवर छोटी-मोठी टपरी टाकून पोट भरत आहेत, तर महिला मोलमजुरी करून परिवाराला हातभार लावत आहेत.
मानकापूर परिसरात सध्या ठिकठिकाणी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स व रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे काम मिळविण्याच्या आशेने अनेक महिला मजूर मानकापूर ठिय्यावर सकाळपासून दुपारपर्यंत ४४-४५ डिग्री तापमानात उघड्यावर बसून व उन्हाचे चटके सहन करीत तासनतास बसून असतात. मात्र त्याउपरही पदरी निराशाच पडते.
कधी हाताला काम मिळते, तर कधी दुपारपर्यंत प्रतीक्षा करूनही पदरी निराशा पडते. त्यामुळे बऱ्याचवेळा रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. हे चक्र कित्येक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असल्याची व्यथा ठिय्यावरील ज्योती धोंडेकर, लता कनोजे व माया भोंडेकर या महिलांनी बोलून दाखविली.
या महिलांच्या मते, हाताला नियमित काम मिळाले तरच घरची चुल पेटून सुखाचे दोन घास पोटात पडतात. अन्यथा उपाशीपोटीच झोपी जावे लागते. गंगानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या या मजुरांना सरकारकडून थोडेफार राशन-पाणी अवश्य मिळते. मात्र किराणा व अन्य आवश्यक वस्तूंसाठी इकडेतिकडे हातपाय मारावे लागतात. अनेक घरांमध्ये लहान मुले आहेत. या मुलांची त्यांना अधिक चिंता असते. महागाईनेही त्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या स्थितीत त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन मानकापूरचा हा ठिय्याच आहे. या ठिय्यामुळे त्यांना दोनवेळची भाकरी मिळतेय.
मी गेल्या १५ वर्षांपासून नियमित ठिय्यावर येत आहे. रोजमजुरीची कामे करते. कधी काम मिळते, कधी निराश होऊन परतते. काम मिळाले तरच घरची चूल पेटते. एवढ्याशा कमाईत घर चालत नाही. मात्र त्याला इलाजही नाही. आहे त्या परिस्थितीत खुश आहे.
-ज्योती धोंडेकर, मजूर