राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ
शाळा सुरू असताना जे-जे करता येत नाही ते-ते करण्यासाठीच तर असते सुट्टी. सुट्टी म्हणजे नुसती धमाल नाही आणि नुसता टाइमपासही नाही. सुट्टी म्हणजे नवनवीन गोष्टी करण्याची धमाल आणि त्यातून नवीनच काही शिकण्याची कमाल!
या सुट्टीत वेगवेगळ्या फळांच्या बिया जिथून मिळतील तिथून जमवा. साफ करून ठेवा. त्याचे वर्गीकरण करा. पावसाळ्यात सहलीला जाल तेव्हा या बिया डोंगरावर, बागेत किंवा रस्त्याच्या बाजूला रुजवण्याचा प्रयत्न करा.
प्रत्येक फळ कापण्याची पद्धत वेगळी असते आणि ती प्रयत्नपूर्वक शिकावी लागते. या सुट्टीत आंबा, कलिंगड, पपनस, टरबूज, पपई, अननस अशी फळे वेगवेगळ्या पद्धतीने आवर्जून कापा आणि कापण्यातली गोडी अनुभवा.
गाजर, काकडी, मुळा, टोमॅटो, बीट किंवा कोबी यांची कोशिंबीर करणं तुम्हाला सहज जमू शकतं. आठवड्यातून दोनदा अवश्य करा. घरातलेच काय शेजारीही आनंदाने खातील.
सुट्टीतल्या एका रविवारी घरातल्या सगळ्यांनी ‘आपले कपडे आपण धुवायचे’ असं ठरवा. सगळ्यांनी मिळून कपडे धुवा. कपडे धुण्याचे तंत्र आणि मंत्र शिकताना पाण्यात मस्त दंगा करा.
या सुट्टीत तुम्ही तुमच्या घराची ‘आर्ट गॅलरी’ही करू शकता. सुट्टीच्या दिवशी मुलांनी घरातल्या मोठ्या माणसांना समोर बसवून त्यांचे चित्र काढावे. मग मोठ्या माणसांनी त्याचप्रमाणे मुलांचे चित्र काढावे. प्रत्येक चित्रावर नाव न लिहिता चित्राखाली फक्त चित्रकाराचे नाव लिहावे. ही चित्रे भितींवर लावून त्यावर ‘आम्ही सर्व’ असे शीर्षक द्यावे.
सेल्फी काढा पाच बोटांनी. एखाद्या दिवशी दुपारी जेवण झाल्यावर घरातल्या आरशासमोर खुर्ची घेऊन बसा. थोडावेळ निवांतपणे स्वत:ला पाहा. स्वत:कडे पाहा. मग आरशात पाहून स्वत:चेच मस्त चित्र काढा. चित्राखाली नाव न लिहिता चित्रातील व्यक्ती तुमच्या घरातल्यांना, शेजारच्यांना किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींना ओळखता येते का पाहा.
जुन्या निमंत्रणपत्रिकांचा कल्पकपणे वापर करून त्यापासून सुंदर बुकमार्क्स तयार करा. इतिहास, भूगोल, गणित, मराठी, इंग्रजी अशा विषयांसाठी वेगवेगळे लोगो तयार करा. म्हणजे प्रत्येक विषयाच्या पुस्तकासाठी वेगळा बुकमार्क असेल. असे आणखी बुकमार्क करुन, शाळा सुरू झाली की मित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाची भेट द्या.
निरनिराळी फळे, फुले, भाज्या व कंदमुळे यापासून आपणास वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करता येतात. उदा. आंबा, बीट, कोथिंबीर, गाजर, पालक, हळद, पळसाची फुले, जांभूळ, चिंच, शेवंतीची फुले इ. फक्त नैसर्गिक रंग वापरून तुम्हाला सुंदर चित्र रंगवता येतील. (यातील काही रंगीत चित्रे चविष्टही असतील)
आठवड्यातून एक दिवस किमान एक वेळ तरी आईसोबत स्वयंपाकघरात काम करायचेच आहे. म्हणजे आईचे काम वाढवायचे नाही तर हलके करायचे आहे.
रोज घरासमोर वेगळे सुशोभन. सुशोभन करण्यासाठी टाकाऊ वस्तूंचाच वापर करा. सुशोभन करण्याच्या विविध पद्धती आहेत. घरासमोर एखाद्या फरशीवर किंवा मातीत कुठलेही एक चित्र काढा/ आकृती काढा/ ठिपक्यांची रांगोळी काढा व त्यात रंग न भरता त्यात टाकाऊ वस्तूंचा उपयोग करा. उदा. बांगड्यांच्या काचा, फळांच्या साली, रंगीत कागदांचे तुकडे, निर्माल्य, रानटी फुले, सुक्या फुलांचा चुरा, गवत, बिया, रंगीबेरंगी चिंध्या, शेंगांची टरफले, चहाचा चोथा इत्यादी. मला खात्री आहे, तुमच्या घरापुढचं अप्रतिम सुशोभन पाहून तुमचे शेजारी तुमच्यापासून स्फूर्ती घेतील आणि मग त्यांचे शेजारीही. तुम्ही सुरुवात तर करा- मग तुम्ही जिकडे पाहाल तिकडे सुशोभनच सुशोभन!
तुमच्या जवळच्या मित्रांना एका संध्याकाळी घरी बोलवा. कुणी काय करायचे याचे नियोजन करून, सर्वांनी मिळून चटकदार ओली भेळ करा आणि तुमच्या पालकांना खिलवा. ही ‘खिलवाखिलवी’ मग सर्वच मित्रांच्या घरी करा.
‘करून पाहण्यासाठी आणि करता-करता स्वत:हून शिकण्यासाठी असते सुट्टी’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा.