आयपीएल 2025 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जबरदस्त कामगिरी केली. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर वाटेला प्रथम फलंदाजी आली. मात्र आरसीबीकडून सलामीला आलेल्या जेकॉब बेथेल आणि विराट कोहली यांनी चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 97 धावांची भागीदारी केली. जेकॉब 55 धावा, तर विराट कोहली 62 धावा करून बाद झाला. हे दोन खेळाडू बाद झाल्यानंतर धावांची गती मात्र मंदावली. देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटिदार काही खास करू शकले नाहीत. त्यामुळे धावा 170 च्या आसपास होतील असं वाटलं होतं. पण रोमारियो शेफर्ड नावाचं वादळ मैदानात घोंघावलं. त्याने समोर येईल त्याला धुतला. अवघ्या 14 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकार मारून अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 5 गडी गमवून 213 धावांपर्यंत मजल मारली. तसेच विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही चेन्नई सुपर किंग्सला गाठता आलं नाही. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 5 गडी गमवून 211 धावा केल्या. आयुष म्हात्रेने 94 धावांची खेळी केली पण ती व्यर्थ गेली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच आरसीबीने एकाच पर्वात दोनदा चेन्नई सुपर किंग्सला नमवलं.
शेवटच्या षटकात चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 15 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी धोनी स्ट्राईकला होता. त्याने एक धाव काढली आणि रवींद्र जडेजाला स्ट्राईक दिली. दुसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजान एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकला असलेला धोनी पायचीत झाला. त्यानंतर शिवम दुबे फलंदाजीला आला आणि चौथ्या चेंडूवर त्याने षटकार मारला. पण हा चेंडू कंबरेच्या वर असल्याने दुबेने रिव्ह्यू घेतला. पंचांनी नो बॉल दिला. त्यामुळे तीन चेंडूत सहा धावांची गरज होती. त्यानंतर एक धाव आली. दोन चेंडूत पाच धावांची गरज आणि समोर रवींद्र जडेजा स्ट्राईकला होता. पुन्हा एक धाव आली. शेवटच्या षटकात 4 धावांची गरज होती. स्ट्राईकला दुबे होता. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली आणि आरसीबीने हा सामना 2 धावांनी जिंकला.
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ स्पर्धेतून आऊट आहेत. पण प्लेऑफमधील स्थान पक्कं करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा पहिला संघ ठरला आहे. कारण प्लेऑफमधील जागा पक्की करण्यासाठी 16 गुण आवश्यक आहे. जर तर झालं तरी चौथ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हा संघ कायम राहणारं हे पक्कं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची आता टॉप 2 मध्ये राहण्याची शर्यत सुरु झाली आहे. आता पुढच्या सामन्यात कशी कामगिरी होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, 18व्या पर्वात आरसीबी जेतेपद मिळवेल का? याकडे चाहत्यांचा नजरा लागून आहेत.