इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला शनिवारी (३ मे) रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बंगळुरूने घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अवघ्या २ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात बंगळुरूने २० षटकात ५ बाद २१३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून जेकॉब बेथल (५५), विराट कोहली (६२) आणि रोमारियो शेफर्ड (५३*) यांनी अर्धशतके केली. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकात ५ बाद २११ धावाच करता आल्या. चेन्नईकडून आयुष म्हात्रेने ९४ धावांची खेळी केली. त्याने रवींद्र जडेजासोबत ११४ धावांची भागीदारीही केली. शेवटच्या २ षटकात चेन्नईला विजयासाठी २९ धावांची गरज होती.
१९ व्या षटकात धोनी आणि जडेजाने मिळून १४ धावाही ठोकल्या. शेवटच्या षटकात १५ धावांची गरज होती. पण यश दयालच्या गोलंदाजीवर पहिल्या दोन चेंडूत दोनच धावा निघाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर धोनी १२ धावांवर बाद झाला.
त्यानंतर शिवम दुबेने नोबॉलवर षटकार मारला. पण नंतरही तीनच धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला पराभवाचा सामोरे जावे लागले. जडेजा ७७ धावांवर नाबाद राहिला.
या पराभवानंतर धोनी म्हणाला, 'मी जेव्हा मैदानात फलंदाजीला गेलो, तेव्हा काही चेंडूत धावा हव्या होत्या. मला असं वाटतं मी काही मोठे शॉट्स खेळायला हवे होते, ज्यामुळे दबाव हटला असता. मी स्वत:ला यासाठी दोष देतो.'
'सामन्यात बंगळुरूने चांगली सुरुवात केली होती. पण नंतर आम्ही सामन्यात परत आलो, पण रोमारियो शेफर्ड्सने शानदार खेळ केला. त्याला गोलंदाजांच्या प्रत्येक चेंडूवर मोठे शॉट्स खेळता येत होते.'
धोनी पुढे म्हणाला, 'आम्हाला यॉर्कर्सचा आणखी सराव करावा लागणार आहे. बऱ्याचदा जेव्हा फलंदाजांच्या बॅटवर चेंडू चांगला येतो, तेव्हा तुम्हाला यॉर्कर्सवर अवलंबून रहावे लागते. जर तुमचा योग्य यॉर्कर पडला नाही, तर फुल टॉस हा आणखी एक सर्वोत्तम गोष्ट असते. हा आणखी एक चेंडू असा आहे, ज्यावर मोठे फटके खेळणे कठीण असते.'
'पाथिराना सारख्या गोलंदाज, ज्याच्या गोलंदाजीवर यॉर्कर पडला नाही, तरी त्याच्याकडे वेग आहे. तो बाऊन्सर टाकू शकतो आणि फलंदाजांला गोंधळात टाकू शकतो. कधी तो जेव्हा बाऊन्सर टाकण्याचा विचार करतो, जेव्हा फलंदाज लाईनकडे लक्ष देतात आणि जर तो यॉर्कर टाकू शकला नाही, तर फलंदाजांना मोठा शॉट्स खेळण्याची संधी असते.'
धोनी म्हणाला, 'अशा चेंडूवर स्कूप खेळू शकतो, पण सर्व फलंदाज स्कूप खेळू शकत नाहीत. हे नैसर्गिक असायला हवे, जर तसे नसेल तर ते कठीण जाते. या नव्या युगात तुम्हाला अशा गोष्टींसाठी सरावाची गरज असते. आमचे बरेच फलंदाज पॅडल शॉट खेळू शकत नाहीत. जड्डू खेळू शकतो, पण त्याने त्याच्या ताकदीवर विश्वास ठेवण्याला महत्त्व दिले.'
धोनीने आयुष म्हात्रेचे देखील कौतुक केले आहे. दरम्यान, चेन्नईचा हा नववा पराभव होता. त्यांचे या स्पर्धतील आव्हान यापूर्वीच संपले आहे. आता त्यांचे तीन सामने बाकी आहेत.