आयपीएलच्या 18 व्या मोसमात सलग 4 सामने जिंकून धमाकेदार सुरुवात करणारी दिल्ली कॅपिट्ल्स टीम प्लेऑफच्या तोंडावर ट्रॅकवरुन घसरली आहे. दिल्लीला गेल्या 2 सामन्यात सलग पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफच्या तोंडावर दिल्लीचं टेन्शन वाढलं आहे. त्याामुळे दिल्लीला आता सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयी होण्यासह पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसर्या बाजूला हैदराबाद या हंगामातून जवळपास बाहेर झालेली आहे. त्यामुळे हैदराबादकडे गमावण्यासारखं काहीच नाही. मात्र हैदराबाद दिल्लीवर मात करुन गेल्या पराभवाची परतफेड करण्यासह अडचणी वाढवू शकते. त्यामुळे हा सामना फार रंगतदार होण्याची शक्यता आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात आज 5 मे रोजी राजीव गांधी स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील एकूण 11 सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची 30 मार्चनंतर आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. दिल्लीने गेल्या सामन्यात हैदराबादवर 7 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे हैदराबाद या पराभवाचा हिशोब बरोबर करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे.
दिल्लीने 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर 4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. दिल्लीचा नेट रनरेट हा +0.362 असा आहे. तर दुसऱ्या बाजूला हैदराबाद अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली नाही. मात्र ते स्वत:च्या जोरावर प्लेऑफमध्ये पोहचू शकत नाहीत, हे देखील तितकंच खरं आहे. हैदराबादला 10 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे. हैदराबाद 6 गुणांसह पॉइंट्स टेबलध्ये नवव्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा -1.192 असा आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स दोन्ही संघ आयपीएल इतिहासात एकूण 25 वेळा आमनेसामने आले आहेत. एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. हैदराबादने 25 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने हैदराबादवर 12 वेळा मात केली आहे. तसेच दिल्लीला गेल्या 5 पैकी 3 सामन्यांमध्ये विजयी होता आलं आहे. तर हैदराबादने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे या संघात जोरदार चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.