पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रचंड तणावाची स्थिती आहे. युद्धाची शक्यता आहे. भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एअर फोर्स चीफ, नौदल प्रमुख, संरक्षण सचिव यांच्यासोबत सतत उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. तिथे पाकिस्तानला सुद्धा जाम युद्धाची खुमखुमी आली आहे. म्हणून पाकिस्तानी नेते भारताला धमक्या देत आहेत. हे सगळं सुरु असताना आता पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानसाठी टर्की उभा राहिल अशी स्थिती असताना आता भारताचा जुना मित्र संकटकाळात भारताच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोनवरुन चर्चा केली. पुतिन यांनी, भारतात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी निरपराध व्यक्तींच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं. दहशतवादाविरुद्ध आपण भारतासोबत आहोत, हे पुतिन यांनी ठणकावून सांगितलं.
या क्रूर हल्ल्याच कारस्थान रचणाऱ्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे असं दोन्ही नेत्यांचं मत आहे. दोन्ही नेत्यांनी रणनितीक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. रणनितीक भागीदारी हे शब्द पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांना 80 व्या विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वर्षाच्या अखेरीस भारतात आयोजित होणाऱ्या वार्षिक शिखर सम्मेलनाच निमंत्रण दिलं.
तुर्कीच्या युद्धनौका पाकिस्तानी बंदरात
सध्या निर्माण झालेल्या परिस्थिती तुर्कीच्या युद्धनौका पाकिस्तानी बंदरांमध्ये दिसत आहेत. त्यांचे सैन्य अधिकारी पाकिस्तानी एअर फोर्सच्या ऑफिसमध्ये दिसतायत. अशावेळी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं भारतासोबत उभं राहण्याच वक्तव्य खूप महत्त्वपूर्ण ठरतं.
हे पाकिस्तानला परवडणारं नाही
रशियाने भारताला मदत करण्याच आश्वासन दिलं आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. रशियासारखा बलाढ्य देश भारतासोबत राहणं हे पाकिस्तानला परवडणारं नाही. भारत आणि रशिया हे जुने मित्र देश आहेत. अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये उत्तम संरक्षण संबंध आहेत. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाला. यात 26 निर्दोष पर्यटकांची हत्या करण्यात आली. अनेक पर्यटक जखमी झाले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला.