Supreme court: मुघलांची वंशज असल्याचा दावा करणाऱ्या महिलेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलीय. मुघलांची वंशज आहे म्हणत सुल्ताना बेगम हिने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर हक्क सांगितला होता. तिचं म्हणणं होतं की, १८५७ मध्ये इंग्रजांनी चुकीच्या पद्धतीने किल्ला ताब्यातून घेतला होता. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या पीठाने या याचिकेवर आश्चर्य व्यक्त करत म्हटलं की, तुम्ही फक्त लाल किल्लाच का मागितला? फतेहपूर सिक्रीसुद्धा मागायची. इतर इमारती का सोडल्या?
यांनी २०२१ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून लाल किल्ला माझ्याकडे सोपवा अशी मागणी केली होती. मी मुघल बादशाह बहादुर शाह जफरच्या खापरपणतूची विधवा असल्याचं तिने म्हटलं होतं. दरम्यान, उच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली होती. जर हे सगळं खरं मानलं तरीही १६४ वर्षानंतर केल्या जाणाऱ्या कोणत्याही दाव्यावर विचार केला जाऊ शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं होतं.
दरम्यान, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर अडीच वर्षांनी उच्च न्यायालयाच्या दुहेरी पीठाकडे याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या पीठाने डिसेंबर २०२४ मध्ये याचिका दाखल करण्याला पण एक मर्यादा असते असं म्हणत याचिका फेटाळली होती. ९०० दिवसानंतर दाखल केलेली याचिका विचार करण्यायोग्य नाही असं स्पष्ट केलं होतं.
शेवटी सुल्ताना बेगमनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी कठोर शब्दात याचिकाकर्त्या सुल्ताना बेगमला सुनावलं. तिच्या वकिलांनी विनंती केली की, फक्त उशिरा याचिका दाखल केली म्हणून ती फेटाळण्यात यावी. मात्र सरन्यायाधीशांनी ही विनंती अमान्य केली. यामुळे भविष्यात सुल्ताना बेगम पुन्हा लाल किल्ल्यावर दावा करू शकणार नाही.