माणूस आणि निसर्गाची मैत्री
esakal May 06, 2025 06:45 AM

गौरी देशपांडे - gaurisdeshpande1294@gmail.com

बुमोनी आणि तिचं छोटं कुटुंब- आई-बाबा, भाऊ आणि बहीण असे सगळे आनंदानं जगत होते. बुमोनी हे नाव जरा वेगळं! आपल्याला फारसं परिचित नसलेलं, हो ना? कारण बुमोनी आपल्या जवळपास राहणारी नाहीच आहे. ती आहे आसामची. नेमकं सांगायचं तर, तुम्हाला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान माहीतय ना? हां.. तर त्याच्या बाजूलाच आहे तिचं घर. घराला आहे एक मोठं अंगण. अंगणात आहेत केळीची झाडं! खूप खूप झाडं! मात्र, एवढ्या सगळ्या झाडांचं ते करायचे काय? घरातल्या प्रत्येकानं झाडाच्या एकेका भागाची जबाबदारी उचलली होती. बाबा केळीचे लांब खोड कापत, त्याची होडी बनवत आणि ती घेऊन नदीमध्ये मासेमारी करायला जात. भाऊ झाडाच्या खोडापासून वाडगे बनवायचा. आई केळफुलाची भाजी करायची. बहीण केळीची पानं जेवणासाठी मांडते. आणि बुमोनी? बुमोनी हवं तेव्हा हवी तेवढी केळी फस्त करायची.

केळफुलाची भाजी, माश्याची आमटी आणि भात असं मस्त जेवण झालं की, उष्टी ताटं - म्हणजे केळीची पानं - ते एका खड्ड्यात टाकत. तिथे गायी येऊन ती खाऊन टाकत. केळीचं झाड असं पूर्णपणे त्यांच्या उपयोगी पडत असे! एकदा रात्री एक हत्तींचा कळप नदी ओलांडून आला. बुमोनाच्या अंगणातली केळीची झाडं त्यांनी पायदळी तुडवली. केळी आणि पानं खाऊन टाकली! हत्ती दुसऱ्या दिवशी रात्री परत आले. त्यांनी आणखी केळी आणि पानं खाल्ली. आश्चर्य म्हणजे, तिसऱ्या दिवशीसुद्धा हत्ती आले! त्यांनी आणखी केळी आणि पानं खाऊन टाकली! हत्तींचा त्रास दिवसागणिक वाढतच जाईल असं दिसत होतं. या खादाड हत्तींपासून आपल्या अंगणातली झाडं वाचवायची कशी?

बुमोनीच्या बहिणीने आणि भावाने हत्तींना पळवून लावण्यासाठी बांबूच्या लांब लांब मशाली तयार करायला सुरुवात केली, तेवढ्यात बुमोनीला काही तरी आठवलं. ‘डिगबोईच्या तेलक्षेत्रात हत्तींना दूर ठेवण्यासाठी सिट्रोनेल गवत वापरलं होतं!’ सिट्रोनेल गवताचा वास हत्तींना म्हणे मुळीच आवडत नाही. बुमोनीच्या घरच्यांनी मग केळीच्या झाडांभोवती सिट्रोनेल गवत लावलं. त्या रात्रीसुद्धा हत्ती आले. केळीच्या झाडांजवळ आल्यावर ते थांबले. त्यांनी वास घेतला आणि मग ते चक्क पाठ फिरवून निघून गेले! हुश्श! त्या रात्री बुमोनीचे आई-बाबा, भाऊ-बहीण शांतपणे झोपले. त्यांची काळजी मिटली होती. पण हे काय? बुमोनी जागीच? तिच्या चेहऱ्यावर काळजी अजूनही दिसत होती. डोळे टक्क उघडे ठेवून विचार करणारी बुमोनी, तिच्या निळ्या निळ्या रिबिनी, रात्री केळीची बाग उद्ध्वस्त करणारे अगडबंब हत्ती आणि सोन्यासारखा पिवळ्याशार केळींचा घड- अशी बोलकी चित्रे आहेत पुस्तकात! मुखपृष्ठावर केळीच्या पानाआडून डोकावणारी बुमोनी तर फारच गोड! ही सुंदर चित्रे काढली आहेत तारिक अजीज यांनी. ही मूळ आसामी भाषेतली गोष्ट लिहिलीय मीता बोरदोलय यांनी आणि याचा मराठी अनुवाद केला आहे मानसी मेहेंदळे यांनी. तुलिका प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

रात्रभर विचार करून सकाळी उठल्यावर तिने लगेच आईला विचारलं, ‘‘आई गं, ते हत्ती आता काय खाणार गं?’’ अच्छा! म्हणजे बुमोनी रात्रभर यामुळे अस्वस्थ होती तर! ‘‘ते कदाचित शेजारच्यांच्या शेतातले ऊस किंवा भात खातील’’ असं आईने म्हटल्यावर तिला आपल्याला झाला तसाच त्रास शेजारच्यांना होईल, हे लक्षात आलं. आपली केळी, ऊस, भात हेही वाचेल आणि हत्तींचं पोटसुद्धा भरेल असा काही तरी उपाय शोधायला हवा. बुमोनीने खूप विचार केला.

आयडिया!

तिला एक कल्पना सुचली आणि तिने लगेच ती तिच्या बाबांना कानात सांगितली. बाबांना पण ती कल्पना फारच आवडली.

आता राष्ट्रीय उद्यानातच केळी, ऊस, भात लावला होता! त्यामुळे हत्ती जेवणाचा मनमुराद आनंद लुटू शकणार होते! तेही त्यांच्या हक्काच्या जागेत - त्यांच्या घरात! ही कल्पना होती बुमोनीची! माणूस आणि निसर्ग एकमेकांचे मित्र होऊच शकतात. फक्त आपल्या प्रत्येकात बुमोनीसारखी माहिती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सगळ्यांत महत्त्वाचं संवेदनशीलता हवी! ही संवेदनशीलताच मग विचारचक्र सुरू करते, हाती असलेल्या माहितीचा कल्पक वापर करायला भाग पाडते आणि मग अशी एखादी भन्नाट आयडिया सूचते! हत्तींच्या जेवणाची काळजी करणारी चिमुकली बुमोना कुठे आणि जनावरांना मारहाण करणारी, त्यांची घरं ओरबाडून घेणारी मोठी माणसं कुठे!

बरं का, ही गोष्ट लिहिली गेली त्यानंतर साधारण ५ वर्षांनी (२०१९ मध्ये) मध्य आसामच्या नागाव जिल्ह्यातल्या काही गावांनी मिळून हत्तींपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी एक अशी जमीन खास तयार केली जिथे हत्ती येऊन जेऊ शकतील. माणूस आणि प्राणी यांच्यातलं मैत्र टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने उचलेलं हे किती महत्त्वाचं पाऊल, नाही का? त्या दिवसानंतर बुमोनीची काळजी मात्र खऱ्या अर्थी मिटली आणि हत्ती? ते तर एकदम आनंदात होते - केळी आणि ऊस यांची मेजवानी लुटत!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.