भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रसंघात धावाधाव, बैठकीत काय झाले? राजदुताने सांगितले
GH News May 06, 2025 10:07 AM

भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव सुरु आहे. भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासंघाकडे धाव घेतली. पाकिस्तान राजदुताची सुरक्षा परिषदेत बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संभाव्य प्रयत्नांवर चर्चा झाली. बैठकीनंतर बोलताना पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीतून जे काही साध्य करायचे होते ते पूर्ण झाले आहे. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यावरही चर्चा केली. दक्षिण आशियात निर्माण होणारा तणाव कमी व्हावा यासाठी पाकिस्तानने ही बैठक बोलावण्याची विनंती केली होती.

पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून लष्करी कारवाई होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननेच घाईघाईने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सुरक्षा परिषदेची बैठक बोलावून भारताला संयम बाळगण्याचे सांगितले. परंतु ही बैठक सभागृहात नाही तर चेंबरमध्ये झाली.

पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार यांनी बैठकीनंतर सांगितले की, सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू आणि काश्मीर वादासह सर्व मुद्दे शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याची गरज ओळखली. प्रादेशिक स्थिरता एकतर्फी राखता येत नाही, हे देखील स्पष्टपणे मान्य करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आवश्यक आहे, असे ठरल्याचे इफ्तिखार यांनी सांगितले.

भारत-पाकिस्तान मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीबाबत युएनकडून अद्याप काहीच माहिती देण्यात आली नाही. परंतु पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या बातमीत पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार यांनी माहिती दिली आहे. भारताने २३ एप्रिल रोजी एकतर्फी उचललेल्या पावलांवर गंभीर चिंता व्यक्त केली असल्याचे इफ्तिखार यांनी म्हटले.

पहलगामध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यानंतर २३ एप्रिल रोजी भारताने पाच निर्णय जाहीर केले होते. त्यात सिंधू पाणी करार रद्द केला होता. त्यामुळे पाकिस्तानात पाण्याचे गंभीर संकट निर्माण होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.