आजार आणि करिअर
esakal May 06, 2025 12:45 PM

आशा नेगी - लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

कर्करोग ही केवळ शरीराची नाही, तर मनाचीही परीक्षा असते. या आजाराचा सामना करताना उपचारांचे त्रास, मानसिक तणाव, सामाजिक व कौटुंबिक अपेक्षा आणि आर्थिक जबाबदाऱ्या या सगळ्यांशी एकाचवेळी लढावं लागतं. विशेषतः कर्करोगाशी झुंजणारी व्यक्ती एक स्त्री असते, तेव्हा तिच्यावरच्या जबाबदाऱ्यांचं ओझं अधिकच वाढतं. कारण ती एक आई, मुलगी, पत्नी आणि अनेकवेळा घरातली आर्थिक कणादेखील असते.

अशा परिस्थितीत ‘करिअर’ आणि ‘कॅन्सर’ यामधला समतोल राखणं हे एक अवघड; पण शक्य असलेलं समीकरण आहे. काही स्त्रिया उपचारादरम्यानही आपलं काम सुरू ठेवतात पूर्ण वेळ किंवा अंशतः, तर काहीजणी विश्रांती घेऊन पुन्हा कार्यक्षेत्रात परतण्याचा निर्धार करतात. त्यांच्या या प्रवासात कुटुंबाचा, सहकाऱ्यांचा आणि कंपनीच्या धोरणांचा मोठा वाटा असतो. अनेक कंपन्यांनी आता ‘वर्क फ्रॉम होम’, ‘फ्लेक्सिबल वर्क अवर्स’ किंवा ‘कॅन्सर लीव्ह’सारख्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, ज्यामुळे रुग्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना मानसिक व शारीरिक आधार मिळतो; पण अजूनही अशा संधी सर्व ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे समाज, संस्था आणि सरकार यांनी एकत्र येऊन या स्त्रियांसाठी एक आधारभूत रचना उभी करणं गरजेचं आहे.

माझ्या कॅन्सर प्रवासात मी माझं रुटीन लाइफ बदललं नाही. मी व्यस्त राहिले... किंवा जाणीवपूर्वक स्वतःला व्यस्त ठेवलं आणि त्याचा फायदा माझ्या पूर्ण ट्रीटमेंटमध्ये मला झाला. आजाराला जास्त महत्त्व न देता, मी माझ्या ट्रीटमेंटवर फोकस ठेवला. त्याचबरोबर कामाकडेही दुर्लक्ष केलं नाही.

या लढाईत स्वतःची कार्यक्षमता जपणाऱ्या स्त्रिया, रोज नव्यानं जगायला शिकतात. शारीरिक मर्यादा स्वीकारून, मानसिक शक्तीचा आधार घेत त्या स्वतःला आणि इतरांना प्रेरणा देतात. काहीजणींनी उपचार चालू असतानाही आपल्या कामात उत्कृष्ट योगदान दिलं आहे. या उदाहरणांमुळे आजारपण म्हणजे अपयश नव्हे, तर संयम आणि संघर्षाचं प्रतीक बनलं आहे. या अनुभवातून हे समजतं की व्यस्त राहणं आणि कामात लक्ष देणं, केवळ मानसिक बळच नाही तर उपचारासाठीही फायदेशीर ठरतं.

कर्करोगाशी झुंजणाऱ्या अनेक महिलांशी माझा संपर्क येतो. अशीच एक आयटी पार्कमधली महिला माझ्या संपर्कात आली. सुरुवातीला ती खूप घाबरलेली होती, टेन्शनमध्ये होती. तिला वाटत होतं, की जॉब सोडून ट्रीटमेंटकडे लक्ष दद्यावं. मी तिला म्हणाले, ‘‘बघ, ट्रीटमेंट आणि करिअर दोन्ही एकाच वेळेस करता येतं. स्वतःला बिझी ठेव. त्याचा फायदा तुला ट्रीटमेंटमध्येही होईल.’’ आज ती बिनधास्तपणे कामही करते आणि उपचारही घेते.

स्मिता यांचं उदाहरण. स्मिता आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होत्या. कॅन्सर झाला, तरी त्यांनी घरून काम चालू ठेवलं. कंपनीच्या पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या इच्छाशक्तीमुळे केमोथेरपीच्या दरम्यानसुद्धा जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्या म्हणतात, ‘‘काम करत राहणं म्हणजे माझ्या आत्मविश्वासाचं बूस्टर डोस होतं.’’ उपचारांच्या काळात त्यांनी तीन केमोथेरपी सत्रं पूर्ण करूनही आपल्या टीमसाठी काम करत राहण्याचा निर्धार केला.

सुरुवातीला त्यांना थकवा आणि मानसिक तणाव होता; पण त्यांनी लवचिक वेळापत्रक स्वीकारून, घरून काम सुरू ठेवलं. कंपनीनं त्यांना मानसिक आरोग्यासाठी सल्लागार दिला आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. आज स्मिता पूर्णतः बऱ्या असून पुन्हा पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. त्या म्हणतात, ‘‘कर्करोगाने माझं शरीर थकवलं; पण मन अधिक मजबूत केलं. कामावरून आलेला आत्मविश्वासच माझ्या बरे होण्याचा आधार ठरला.’’

स्मिता यांच्यासारख्या स्त्रिया आज अनेकांच्या प्रेरणेचा स्रोत ठरत आहेत. अशा अनुभवांमधून हे स्पष्ट होतं की कर्करोग म्हणजे पूर्णविराम नाही, तो केवळ एक ‘कॉमा’ आहे – थोडा थांबा; पण मग नव्यानं सुरू होणारा प्रवास. समाजाने या स्त्रियांच्या प्रवासाकडे फक्त सहानुभूतीने नव्हे, तर आदराने पाहायला हवं. कारण त्या कर्करोगाशी लढतानाच आपल्या स्वप्नांशीही लढत असतात. त्या जीवनाची नवी व्याख्या करतात जिथे आजार म्हणजे अंत नाही, तर एक नवा आरंभ असतो.

अशा स्त्रियांनी आपली कहाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, कारण त्यांच्या अनुभवातून अनेकांना नवसंजीवनी मिळू शकते. संस्थांनीही अशा कर्मचाऱ्यांसाठी लवचिक धोरण राबवून, ‘आरोग्य आणि करिअर’ या दोघांनाही समान महत्त्व देणारी कार्यसंस्कृती निर्माण केली पाहिजे. कारण कर्करोगावर मात करणं हे एकटं वैद्यकीय गोष्ट नसून, ती आहे एक सामाजिक लढाई - जी आपल्याला एकत्र लढायची आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.