बेटा : (नेहमीच्या स्मार्ट उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण…मम्मा आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (पक्षकार्याची कागदपत्रे हातावेगळी करता करता) वेलकम, बेटा! कधी आलास अमेरिकेहून?
बेटा : (हातातला बोर्डिंग पास दाखवत) हा काय आत्ताच लँड झालो! मस्त टूर झाली! माझे परदेशदौरे नेहमीच यशस्वी होतात!! लोक जाम खुश होते…
मम्मामॅडम : (नापसंतीनं) तिथं जाऊन काहीबाही बोलतोस, मग इथं ते नतद्रष्ट कमळवाले यथेच्छ नालस्ती करतात तुझी! मला मुळ्ळीच आवडत नाही ते!! ते जाऊ दे! काय म्हणतेय अमेरिका?
बेटा : (उत्साहात) कूल!! …तिथं मी सगळ्यांना सॉरी म्हणालो, मम्मा!! मग ते थँक्यू म्हणाले! मग मी परत सॉरी म्हणालो! त्यांनी पुन्हा ‘थँक्स अ टन’ असं म्हटलं, मग माझा पुन्हा नाइलाज झाला, मी पुन्हा-
मम्मामॅडम : (हातातले कागद गळून पडत) कशाला पुन्हा पुन्हा सॉरी म्हणायचं लोकांना? आपण कुणाचं काय घोडं मारलंय?
बेटा : (खुलासा करत) तिथं मी अनेक परिसंवादांमध्ये भाग घेतला! प्रकट मुलाखती दिल्या! व्याख्यानं दिली!! सध्या परदेश दौऱ्यासोबतच मला आत्मपरीक्षणाचा दौरा पण पडलाय बहुतेक!
मम्मामॅडम : (घाईघाईनं) घडलेला दौरा वेगळा आणि पडलेला दौरा वेगळा असतो बेटा!!
बेटा : (तत्त्वचिंतकाची मुद्रा धारण करुन) असू दे! मथितार्थ एवढाच की अधूनमधून सॉरी म्हणावं! तब्बेतीला चांगलं असतं ते! त्यामुळे अहंकार चिकटत नाही मनाला! क्षमाशीलता हा मानवतेचा दागिना आहे!
मम्मामॅडम : (चक्रावून) पण कशाबद्दल सॉरी म्हणालास, ते तरी सांग!
बेटा : (गंभीर मुद्रेने) आपल्या पक्षाच्या आजवरच्या सगळ्या चुका मी पोटात घेतल्या आहेत, मम्मा!!
मम्मामॅडम : (काळजीनं) कशाला असे अघोरी प्रकार करायचे? झालं गेलं गंगेला मिळालं, असं म्हणून पुढे जावं की नाही माणसानं?
बेटा : (सपशेल दुर्लक्ष करुन) अमेरिकेत एका तरुणानं मला पक्षाच्या चुकांबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा मी म्हणालो, ‘‘यह देखो भय्या, पक्षानं केलेल्या चुका मी आनंदाने शिरावर घेतो! आय विल बी मोअर दॅन हॅपी टु टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दोज चुकाज!’’ लोकांनी टाळ्या वाजवल्या माहिताय?
मम्मामॅडम : (कपाळाला बाम लावत) आधीच आपल्या चुका कमी आहेत का? त्यात आणखी जुनी भर कशाला?
बेटा : (प्रामाणिक सूर लावत) मी असंही म्हणालो की, ‘‘गए दस-बारह साल में हमारे पार्टीने वो कुछ नहीं किया, जिसे जरुर करना चाहिए था!’’
मम्मामॅडम : (आव्हानाच्या सुरात) उदाहरणार्थ? सांग ना सांग!
बेटा : (युक्तिवाद करत) आपल्या पक्षानं लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं पाहिजे! आपण प्रेमानं कमळवाल्यांची मनं जिंकली पाहिजेत! त्यांना हे पटवून दिलं पाहिजे की ते जितके दिवस देशावर राज्य करतील, तितकं देशाचं नुकसान होईल! अंतिमत: त्यांच्याच पक्षाचं नुकसान होईल! या देशावर राज्य करण्यासाठी सर्वथा योग्य अशी पार्टी आपलीच आहे! हो की नाही मम्मा?
मम्मामॅडम : (नाक मुरडत) हे त्या कमळवाल्यांना कोण सांगायला जाणार? आपल्या ‘इंडी’ आघाडीतला प्रत्येक जण ‘तुम्ही पुढे व्हा, आम्ही मागाहून येतो’ असंच सांगतोय!
बेटा : (बाणेदारपणाने) मी पुढे जायला तयार आहे!!
मम्मामॅडम : (निक्षून सांगत) नोप!..यापुढे तुझी कबुलीही नको, आणि जबाबही नको!
बेटा : (मान तुकवून) नेत्यानं प्रामाणिक, आणि प्रेमळ असावं!
मम्मामॅडम : (खिन्नपणे) आपलं मोहब्बत की दुकान आहे की माफीचं?