सीमा भानू - editor@esakal.com
सुमारे पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘कोविड’च्या विषाणूने सगळ्या जगात हाहाकार उडवून दिला होता. या महाभयंकर साथीत सुमारे दोन कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. शिवाय भौतिक संपत्तीचे अमाप नुकसान झाले ते वेगळेच. हा महाभयंकर विषाणू कसा पसरला याबाबत शोध घेणाऱ्या काही थोड्याजणांत भारतातील डॉ. मोनाली रहाळकर आणि डॉ. राहुल बहुलीकर या शास्त्रज्ञ पतीपत्नींचा समावेश होता. त्यांनी गेल्या पाच वर्षांत अथक प्रयत्न करून ‘तो नक्की कुठून आला?’ हे ‘कोविड’ च्या उगमापाठीमागील रहस्य आणि वास्तव याची वाचकांना ओळख करून देत हे पुस्तक अतिशय सोप्या आणि आशयघन पद्धतीने मांडले आहे. या विषाणूचा असा महाभयंकर उद्रेक कसा झाला असावा हे समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग वाचकांना नक्कीच होईल. ही साथ वटवाघळांमधून एका अन्य प्राण्यामार्फत माणसात आली असावी, असे त्यावेळी सांगितले जायचे. प्रयोगशाळेतून साथ सुरू झाली असू शकते या शक्यतेची उघड चर्चा अगोदर कोणी करत नसत.
वास्तविक डॉ. मोना या सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ तर डॉ. राहुल हे जैवतंत्रज्ञ, शाश्वत शेती क्षेत्रात काम करणारे. विषाणू हा त्यांचा प्रत्यक्ष विषय नव्हे. पण तरीही केवळ जिज्ञासेपोटी त्यांनी या विषयाच्या खोलात जायचे ठरवले. या संदर्भात सातत्याने माहितीचे आदानप्रदान करणाऱ्या ट्विटरवरच्या ‘ड्रॅस्टीक’ या गटात डॉ. मोना आणि डॉ. राहुल सहभागी झाले. आणि त्यांच्या प्रयत्नांना एक दिशा मिळाल्यासारखी झाली. चीनच्या युनान प्रांतात मोजियांग या ठिकाणी एक तांब्याची वापरात नसलेली खाण होती. तिच्या स्वच्छतेसाठी गेलेल्या काही कामगारांना जो आजार झाला त्याचे साधर्म्य कोविडशी मोठ्या प्रमाणात होते. पण त्याच्या नमुन्यांवर वुहानच्या विषाणूंवर काम करणाऱ्या प्रयोगशाळेत काही काम झाले का? यासंदर्भात प्रश्न विचारणारा या दोघांचा शोधनिबंध ‘फ्रन्टिअर्स’ नियतकालिकात प्रसिद्ध झाला आणि लवकरच दहा वाचकप्रिय शोधनिबंधांत त्याचा समावेश झाला. युनान ते वुहान ही साखळी जोडणारा हा शोधनिबंध स्वीकारला जाणे हे मोठी लढाई जिंकण्यासारखे होते. आता अमेरिकेनेही कोविडचा विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याचे सांगितले आहे.
सुरुवातीला भारतीय माध्यमांना हा विषाणू कुठून आला असावा याची काहीच माहिती नव्हती. कारण विषाणूंच्या संदर्भात काम केलेल्या परदेशी शास्त्रज्ञांनी बाळगलेले मौन आणि केलेली सारवासारव. त्यामुळे जून २१ पर्यंत सगळेच अंधारात होते.. पण हळूहळू इथल्या जिज्ञासूंनी तसेच आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी उल्लेख केल्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडे वेधले गेले. भारतामधून जेव्हा माध्यमांना समजले की डॉ. मोना आणि आणि डॉ राहुल यांनी यावर बरेच काही शोधले आहे, तेव्हा त्यांच्या अनेक मुलाखती, बातम्या प्रसिद्ध झाल्या.
सार्स विषाणूंमध्ये जनुकीय बदल करणे किंवा नवीन संकरित (हायब्रीड) किंवा कृत्रिम विषाणूची निर्मिती याबद्दल चीनमधील वुहानमध्ये प्रयोग सुरू होते. या प्रयोगांना अमेरिकेचे आर्थिक पाठबळ आणि मदतही होती. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथील प्रयोगशाळेत देखील अशा प्रकारचे प्रयोग सुरू होते. आणि अशाच एका संयुक्त प्रकल्पामध्ये कोविड-सम विषाणू बनवायची ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्याचे योजिले होते. वेगवेगळ्या ‘सार्स’, ‘कोरोना’ विषाणूंवर एकच लस शोधणे हे बहुधा उद्दिष्ट होते. जे निसर्गात नाही ते तयार करणे आणि त्यासाठी लसही तयार करणे या खटाटोपातून कदाचित कोविड विषाणूने जन्म घेतला असावा. ज्या प्रयोगशाळांत हे प्रयोग केले जात होते, त्या फारशा सुरक्षित नव्हत्या. त्यामुळे तिथून गळती होण्याची शक्यता होती. शिवाय नैसर्गिक संक्रमण झाल्याचे काहीच पुरावे सापडलेले नसल्याने प्रयोगशाळेतूनच हा विषाणू आला असावा हा निष्कर्षच योग्य असण्याची शक्यता वाढते. अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘एफबीआय’, अमेरिकेचा ऊर्जा विभाग तसेच ‘सीआयए’ यांनीही कोविडची उत्पत्ती प्रयोगशाळेमधून झाली असण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे असे म्हटल्यामुळे, त्याला बळकटी आली आहे, आणि त्याची विश्वासार्हताही वाढली आहे. या सर्वांचा आढावा डॉ. मोना- डॉ. राहुलने घेतला आहे.
या प्रचंड विनाशकारी आजाराचे पडसाद, याबद्दलची माहिती यापुढेही येत राहीलच. मोठा प्रश्न हा आहे की अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी?
लेखक म्हणतात, ‘‘येणारा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा तसेच जैव तंत्रज्ञानाचाही असेल. हे तंत्रज्ञान अन्न, स्वच्छ पाणी, औषधे, आरोग्य यासाठी वापरले तर ठीक पण शस्त्र म्हणून वापरले तर विनाश अटळ आहे. जसे अणुबॉम्ब किंवा विनाशकारी शस्त्रांसाठी नियम आहेत तसेच या विषाणू संशोधन संदर्भातही लावले पाहिजेत.’’
अगदी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असला तरी तो पुस्तकरूपाने मांडणे फार अवघड होते. पण डॉ. मोना आणि डॉ. राहुल यांनी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्यासारखा तो मांडला आहे. सुरुवात एखाद्या रहस्यकथेप्रमाणे असून, तिसरीच व्यक्ती त्यांची गोष्ट सांगते आहे असे स्वरूप ठेवल्याने तो अधिक सोपा झाला आहे.
सगळ्यात विशेष म्हणजे भारतीय भाषांमध्ये या विषयावर लिहिलेले, तेही शास्त्रज्ञांनी, असे पुस्तक अद्याप उपलब्ध नाही. भारतातून प्रसिद्ध झालेले अगदी इंग्रजीतही असे पुस्तक नसावे. एखादे असलेच तर ते केवळ काही माहिती देणारे असावे. या पार्श्वभूमीवर या विषयाच्या सगळ्या बाजू तपासून काही निष्कर्ष काढणारे पुस्तक मराठी शास्त्रज्ञांनी लिहावे ही फार विशेष गोष्ट म्हणावी लागेल.
नवीन प्रयोग, जगण्यातील बदल या सगळ्याचा पहिला परिणाम होतो तो सामान्य माणसावर. पण त्याला या परिणामांबद्दल फारसे अवगत केले जात नाही. कोविडच्या बाबतीतही हेच झाले. ही साथ सुरू असताना जेवढे आपण अंधारात होतो, हे अचानक काय येऊन आदळले याचा विचार करत होतो त्या परिस्थतीत अजूनही फारसा बदल नाही. हे पुस्तक मात्र आपल्याला गरज असलेली सगळी माहिती सोप्या शब्दात देते, त्यामुळे त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. ते आवर्जून वाचायला हवे.
पुस्तकाचे नाव :‘तो’ नक्की कुठून आला ?
कोविडच्या उगमाचे रहस्य आणि वास्तव तुरीयातीत स्वप्न
लेखक : डॉ. मोनाली रहाळकर-बहुलीकर आणि डॉ. राहुल बहुलीकर
प्रकाशक : डॉ. राहुल बहुलीकर (दूरध्वनी - ९०४९९३९०४४)
वितरक : रसिक साहित्य प्रा. लि.
पृष्ठे : १९२ मूल्य : ३५० रुपये.