Akshay Dandwate : दृष्टिहीन अक्षयची नेत्रदीपक कामगिरी! लेखनकाशिवाय दिली बारावीची परीक्षा; मिळाले ८०.५ टक्के गुण
esakal May 06, 2025 06:45 AM

पुणे - अंधत्वावर हार न मानता स्वबळावर यशाची शिखरे गाठणाऱ्या अक्षय दांडवते याने बारावीच्या परिक्षेत लेखनिकाशिवाय ८०.५ टक्के गुण मिळवून नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. यशाला केवळ दृष्टी नव्हे; तर इच्छाशक्तीची गरज असते, हे खऱ्या अर्थाने त्याने सिद्ध केले आहे.

कोरेगाव पार्कमधील अंध मुलांच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या अक्षयने ‘स्वलेखन टायपिंग ट्यूटर’ तंत्रज्ञानाचा उपयोग करून टायपिंगचे कौशल्य आत्मसात केले. ही सुविधा त्याला ‘निवांत अंधमुक्त विकासालय’ संस्थेच्या माध्यमातून मिळाली. ती दृष्टिहीन विद्यार्थ्यांना सशक्त करण्याचे कार्य करते.

बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) बारावीसाठी प्रवेश घेतल्यानंतर अक्षयने स्वतः परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली. ही धाडसी मागणी त्याच्या शिक्षक व मार्गदर्शकांनी महाविद्यालय प्रशासनापर्यंत पोहोचवली. प्राचार्य व शिक्षकांनी संपूर्ण सहकार्य केले.

त्याला स्वतःच उत्तरपत्रिका टाइप करून परीक्षा देण्याची परवानगी दिली. त्याने अकरावीची मुख्य परिक्षा व बारावीच्या सर्व परीक्षा लेखनिकाशिवाय दिल्या. स्वलेखनामुळे मिळालेल्या कौशल्याच्या आधारावर त्याने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

अक्षय म्हणाला, ‘सातवीमध्ये असताना मला स्वलेखनबाबात समजले. त्यावर मी टायपिंगचे कौशल्य शिकण्यास सुरुवात केली. परिक्षेच्या वेळी लेखनिक उपलब्ध होणे, त्याचे अक्षर, ते बरोबर लिहतात की नाही? अशा अनेक गोष्टींमुळे मनात एक भीती होती. त्यामुळे माझ्या कौशल्याचा वापर करत मी स्वतः परिक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यासाठी महाविद्यालयाने सहकार्य व प्रयत्न केले. परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद आहे. त्याहून अधिक आनंद मी स्वतः परीक्षेत सहभागी झाल्याचा आहे. मी संगणकावरील वर्डपॅडवर परीक्षा दिली. त्यासाठी दिलेला वेळ मला पुरेसा होता.

यामुळे आता भविष्यातही परिक्षा देण्यासाठी माझा आत्मविश्वास वाढला आहे. बारावीनंतर आता मला ‘बीबीए’ची (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) पदवी घ्यायची आहे. मला सॉफ्टवेअर इंजिनिअर बनायचे आहे. त्यासाठी आता सीईटी परिक्षाही दिली आहे.’

निवांत संस्थेच्या प्रमुख उमा बडवे म्हणाल्या, ‘अक्षयने केवळ स्वतःचे यश साध्य केले नाही; तर दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी नव्या शक्यतांचा मार्गही खुला केला आहे. त्याच्या यशामुळे समावेशक शिक्षणाच्या संकल्पनेला नवी दिशा मिळाली आहे.’

अक्षयचे यश प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देणारे आहे. त्याला स्वतः परिक्षा देता यावी, यासाठी आम्ही परिक्षेच्या दोन दिवस आधीपर्यंत आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी धडपडत होतो. यंदा महाविद्यालयातून सात दिव्यांग विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यात अक्षयने लेखनिकाशिवाय परिक्षा दिली.

- प्रा. वसंत धिवार, उपप्राचार्य, बीएमसीसी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.