पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करत नवा विक्रम नोंदविला आहे. राज्य मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत ९१.८८ टक्के नियमित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकाल १.४९ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोकण विभागाचा निकाल ९३.७४ टक्के असा सर्वाधिक असून, सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के इतका आहे.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम आणि आयटीआय शाखांसाठी एकूण १४ लाख २७ हजार ८७ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यातील १३ लाख दोन हजार ८७३ विद्यार्थी (म्हणजे ९१.८८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यावेळी उपस्थित होते. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला होता, यंदा निकालात घट झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून, त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ इतकी आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ टक्क्यांनी जास्त आहे. सर्व शाखांमधून एकूण ४२ हजार २४ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी १५ हजार ८२३ विद्यार्थी (३७.६५ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. एकूण सात हजार २५८ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील सहा हजार ७०५ (९२.३८ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत, तर बारावीची ही परीक्षा ३५ हजार ६९७ खासगी विद्यार्थ्यांनी दिली असून, त्यातील २९ हजार ८९२ विद्यार्थी (८३.७३ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.
निकालाची वैशिष्ट्येएकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के
क्रीडा, एनसीसी, स्काउट गाइड साठी २० हजार ९४३ विद्यार्थी सवलतीच्या गुणांसाठी पात्र
निकाल राखून ठेवलेले विद्यार्थी : १३७
१०० टक्के निकाल असणारी कनिष्ठ महाविद्यालये :१९२९
शून्य टक्के निकाल असणारी कनिष्ठ महाविद्यालये : ३८
जेईई, नीट यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा या दृष्टीने दरवर्षीपेक्षा यंदा परीक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली. याशिवाय प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर त्याचा गुण हे ऑनलाइन प्रणालीद्वारे संकलित करण्यात आले. परीक्षेच्या काळात टप्प्या-टप्प्याने तपासलेल्या उत्तरपत्रिका विभागीय मंडळात नेण्याच्या कामाला गती दिली. त्यादृष्टीने सातत्याने पाठपुरावा केला. क्रीडा विभागाचे सवलतीचे गुणदेखील ऑनलाइनद्वारे घेण्यात आले. याशिवाय यंदा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही मोठी साथ दिली, त्यामुळे निकाल दरवर्षीपेक्षा लवकर लावण्यात यश आले.
- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
गेल्या काही वर्षांतील निकालातील उत्तीर्णतेची आकडेवारी (टक्केवारीत)
शाखा : २०२२ : २०२३ : २०२४ : २०२५
विज्ञान : ९८.३० : ९६.०९ : ९७.८२ : ९७.३५
कला : ९०.५१ : ८४.०५ : ८५.८८ : ८०.५२
वाणिज्य : ९१.७१ : ९०.४२ : ९२.१८ : ९२.६८
व्यवसाय अभ्यासक्रम : ९२.४० : ८९.२५ : ८७.७५ : ८३.२६
आयटीआय : ६६.४१ : ९०.८४ : ८७.६९ : ८२.०३
एकूण : ९४.२२ : ९१.२५ : ९३.३७ : ९१.८८
शाखानिहाय निकालातील उत्तीर्णतेची टक्केवारी
विज्ञान : ९७.३५ टक्के
कला : ८०.५२ टक्के
वाणिज्य : ९२.६८ टक्के,
व्यवसाय अभ्यासक्रम : ८३.२६ टक्के
आयटीआय : ८२.०३ टक्के
नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची आकडेवारी
एकूण विद्यार्थी : १४ लाख २७ हजार ८५
परीक्षा दिलेले : १४ लाख १७ हजार ९६९
उत्तीर्ण झालेले : १३ लाख २ हजार ८७३
टक्केवारीनिहाय विद्यार्थ्यांची संख्या
टक्केवारी : विद्यार्थ्यांची संख्या
९० टक्के आणि त्यापुढे : ८,३५२
८५ टक्के आणि त्यापुढे : २२,३१७
८० टक्के आणि त्यापुढे : ४६,३३६
७५ टक्के आणि त्यापुढे : ७४,१७२
७० टक्के आणि त्यापुढे : १,०३,०७०
६५ टक्के आणि त्यापुढे : १,३१,८१२
६० टक्के आणि त्यापुढे : १,८१,७५५
४५ टक्के आणि त्यापुढे : ६,००,२२७
४५ टक्क्यांपेक्षा कमी : १,८०,५४७
कोकण- ९६.७४
पुणे - ९१.३२
नागपूर - ९०.५२
छत्रपती संभाजीनगर - ९२.२४
मुंबई - ९२.९३
कोल्हापूर - ९३.६४
अमरावती - ९१.४३
नाशिक - ९१.३१
लातूर - ८९.४६