व्यायाम : समज नि गैरसमज
esakal May 06, 2025 11:45 AM

महेंद्र गोखले - फिटनेसविषयक प्रशिक्षक

व्यायाम, त्याची पद्धत आणि ट्रेनिंग याबद्दल त्यांच्या मनात काही समज आणि खूप गैरसमज असतात. काही गैरसमजुतीबद्दल माहिती घेऊया.

गैरसमज : व्यायाम करण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे एकदम सकाळी

वास्तव : व्यायाम करण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे रोजच्या रोज निश्चित व्याया करता येईल अशी कोणतीही एक वेळ. तसेच फिटनेस हे तुमचे रोजचे रूटिन असेल, तर रात्री उशिरा जिममध्ये जाणेदेखील योग्य आहे. सकाळी वेळ काढू शकत असाल, तर तेही करायला हरकत नाही.

वेट उचलण्याच्या व्यायामाने फॅट स्नायूंमध्ये बदलते.

वास्तव : आपण फॅट स्नायूंमध्ये बदलू शकत नाही. शरीरशास्त्रदृष्ट्या ते दोन वेगळे टिशू आहेत. अॅडिपोज (फॅटी) टिशू आपल्या त्वचेखाली; स्नायू आणि हृदयासारख्या अंतर्गत अवयवांच्या दरम्यान सँडविच केल्यासारखे असतात. मसल टिशू - ज्यांचे पुढे तीन मुख्य प्रकार असतात आणि त्या संपूर्ण शरीरात असतात. वेट ट्रेनिंगमुळे मसल टिशू फॅट टिशूच्या आजूबाजूला तयार होण्यास मदत करते.

वजन कमी करण्याचा व्यायामच उत्तम मार्ग.

वास्तव : तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असला, तर असे गृहित धरू नये, की तुम्ही जे काही खाता ते शरीरासाठी योग्य आहे. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये खाण्याच्या सवयींमध्ये महत्त्वपूर्ण बदल करायला हवा. वजन कमी करण्याच्या बाबतीत, आहार व्यायामापेक्षा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

ॲब्स क्रंचमुळे पोट कमी होते, हा सिक्स-पॅक मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे.

वास्तव : ॲब्स केवळ आपले ॲब्स टोन करतात; परंतु ते कमी करण्यास मदत करत नाहीत. ते फॅट असते जे आपल्या ओटीपोटावर जमा होते - जे समतोल आहारामुळे आणि कॅलरीच्या कमरतेमुळे कमी करता येते.

वेट ट्रेनिंग केवळ पुरुषांसाठी असते.

वास्तव : वेट ट्रेनिंग हा स्नायूंना बळकट करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि त्याचा स्त्री किंवा पुरुष असा काही संबंध नाही. खरेतर स्त्रिया पुरुषांपेक्षा सरासरी कमी टेस्टोस्टेरॉन तयार करतात. संशोधन असे सांगते, की स्नायू कसे तयार होतील हे आपल्या हार्मोन्सवर अवलंबून असते.

वेट ट्रेनिंग बंद केले, तर आपण जाड होतो.

वास्तव  : आपण वेट ट्रेनिंग थांबवतो तेव्हा आपले लीन बॉडी मास कमी होण्यास सुरुवात होते. लवकरच आपले शरीर आपण कधीच वेट ट्रेनिंग केले नाही असे दिसते; परंतु आपल्या शरीरात ‘मसल मेमरी’ अशी संकल्पना काम करते - ज्यामुळे परत वेट ट्रेनिंग सुरू करणे अजिबात कठीण जात नाही. आपला शारीरिक व्यायाम कमी झाला आणि आहारात बदल झाला नाही, तर ज्या जास्तीच्या कॅलरीज असतात त्यांना शरीरात कुठेतरी जागा मिळाली पाहिजे आणि त्यामुळे आपली जाडी वाढते.

स्पॉट रिडक्शन

वास्तव  : आपल्या शरीरातील फॅट शरीरावर समान पसरलेले असते, त्यामुळे स्पॉट रिडक्शन अशी कोणतीही संकल्पना नसते. एखादी व्यक्ती बायसेप्सवर काम करत असते, तेव्हा त्याच्या ओटीपोटावरचे फॅटही त्याच पद्धतीने कमी होते. मेटाबॉलिक प्रक्रियेमुळे आपल्या शरीरातील फॅट कमी होते; ते कुठूनही येत असले तरी.

वेट ट्रेनिंग वयस्कर लोकांसाठी नसते.

वास्तव : स्ट्रेंथ ट्रेनिंग तरुण वयात करणे हा व्यायामाचा पाया आहे; परंतु वजन वाढेल तसेही हे ट्रेनिंग गरजेचे आहे. स्नायू किती काळ काम करतील हे माहिती नसते म्हणजे त्यांना काही एक्सपायरी डेट नसते, त्यामुळे ज्या ट्रेनिंगमध्ये वजन उचलण्याचा व्यायाम असतो ते कोणत्याही वयात करणे फायदेशीर असते. तिशीच्या सुरुवातीपासून वय वाढेल तसे मसल मास कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सर्व वयाच्या व्यक्तींनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करावे.

स्ट्रेंथ ट्रेनिंग महिलांना बल्की बनवते.

वास्तव : स्त्रियानी पुरुषांसारखे मसल तयार करण्यासाठीचा व्यायाम केला, तर त्यामुळे महिला बल्की होतात असे नाही. अशा गैरसमजामुळे अनेक महिला स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या फायद्यापासून वंचित राहिल्या आहेत. स्त्री किंवा पुरुष कधीही ट्रेनिंगने बल्की होत नाहीत. प्रत्येकाचे शरीर स्ट्रेंग्थ ट्रेनिंगला वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते. काहीजणांचे स्नायू इतरांपेक्षा जास्त वेगाने तयार होतात; परंतु स्नायू बल्की बनवण्याचा विशेष प्रयत्न केल्याशिवाय ते कधीही आपोआप बल्की होत नाहीत. महिलांना स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे अधिक चांगले आणि बळकट स्नायू तयार करता येतात; तसेच त्यांचे टोनिंग चांगले होते.

वजन घटवण्यास कार्डिओ उत्तम मार्ग आहे

वास्तव : बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे, की आपल्याला वजन कमी करायचे असेल, तर आपला एरोबिक व्यायाम वाढवणे गरजेचे आहे. कार्डिओ सुरू करणे हा एकमेव मार्ग आहे. तथापि, शास्त्र याला दुजोरा देत नाही. खरे तर, वजन कमी करण्यासाठी कार्डिओ प्रभावी आहे, हाही फिटनेसचा गैरसमज आहे. वजन कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आवशयक आहे - कारण स्नायू जास्तीत जास्त कॅलरीज वापरतात. मसलचे प्रमाण शरीरात कमी असेल, तर फॅट कमी करायला अडचणी येतात. स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ एकत्र करणे हा उत्तम मार्ग आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकारांतील जे उत्तम आहे ते मिळवता येते. आपण कार्डिओमुळे कॅलरी बर्न करू शकतो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे मसल बनवू शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.