जगभरातील लाखो लोकांचा त्यांच्या श्वासासोच्छवासासोबत संघर्ष सुरू असतो. धावताना, चालताना धाप लागणे ही अनेकांसाठी आता सामान्य समस्या झाली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जाणारा जागतिक अस्थमा दिवस हा अशा दमा असलेल्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा आहे. दमा असलेल्या व्यक्तींच्या अडचणी, त्यांची आव्हाने, आशा या सर्वांशी निगडीत असलेला हा दिवस आहे. यावर्षी हा दिवस 6 मे 2025 रोजी साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त, त्याचा इतिहास, महत्त्व आणि या वर्षीच्या विशेष थीमबद्दल जाणून घेऊयात.
दमा हा एक जुनाट म्हणजेच दीर्घकालीन आजार आहे, जो व्यक्तीच्या श्वसनमार्गावर परिणाम करतो. यामध्ये रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जडपणा येणे , खोकला येणे आणि शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे अशा समस्या येतात. धूळ, धूर, परागकण, हवामानातील बदल किंवा ताण यामुळे ही समस्या आणखी वाढते.
जागतिक दमा दिनाचा इतिहास
जागतिक दमा दिनाची सुरुवात 1998 मध्ये ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा (GINA) नावाच्या संस्थेने केली होती. हे प्रथम स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये सुमारे 35 देशांनी भाग घेतला होता. तेव्हापासून, दरवर्षी GINA हा दिवस वेगवेगळ्या पैलूंकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी एका खास थीमसह साजरा केला जातो.
जागतिक दमा दिनाचे महत्त्व
जागतिक दमा दिन खूप महत्वाचा आहे कारण यादिवशी लोकांना दम्याबद्दल, हा आजार का होतो, त्याची लक्षणे काय आहेत, त्यावर उपचार कसे करता येतील आणि तो होण्यापासून कसा रोखता येईल याबद्दल सांगितले जाते. खरं तर, आजही लोकांच्या मनात दम्याबद्दल अनेक गैरसमज आहेत, म्हणून या दिवसानिमित्त त्या गैरसमज दूर करण्याची आणि योग्य माहिती देण्याची संधी मिळते.
हा दिवस दमा असलेल्या लोकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, हा दिवस सरकारला आणि आरोग्याशी संबंधित संस्थांनाही आठवण करून देतो की त्यांनी चांगल्या योजना बनवाव्यात आणि दमा रोखण्यासाठी आणि उपचारांसाठी आवश्यक गोष्टी पुरवायला हव्यात. एकंदरीत, हा दिवस दम्यावर अधिक संशोधन व्हावे आणि त्यावर नवीन उपचार शोधले पाहिजेत यावरही भर देतो.
जागतिक दमा दिन 2025 थीम
या वर्षी, 2025 च्या जागतिक दमा दिनाची थीम “सर्वांसाठी इनहेलेशन उपचार उपलब्ध करा” आहे. याचा अर्थ असा की श्वसन औषधे सर्व लोकांसाठी सहज उपलब्ध असावीत. दमा नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे, विशेषतः इनहेलरद्वारे घेतली जाणारी आणि स्टिरॉइड्स असलेली औषधे खूप महत्वाची आहेत आणि ती प्रत्येकासाठी उपलब्ध असायला हवीत. या थीमचा उद्देश दम्यामुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करणे आहे. यासोबतच, ही औषधे सर्वत्र उपलब्ध करून देण्यावर अधिक भर दिला पाहिजे.
विचार बदलण्याचीही गरज आहे.
दम्याच्या रुग्णांना केवळ शारीरिक आधाराची गरज नसते, तर त्यांना मानसिक आधाराचीही गरज असते. “स्पर्शाने दमा पसरतो” किंवा “इनहेलर वापरणे व्यसन आहे” यासारखे गैरसमज समाजात प्रचलित आहेत. आजच्या काळात आपण या गोष्टींपासून दूर राहण्याची गरज आहे.
जागतिक दमा दिन 2025 आपल्याला आठवण करून देतो की दमा हा असाध्य आजार नाही. थोडीशी काळजी, योग्य माहिती आणि जीवनशैलीतील बदलांनी ते पूर्णपणे नियंत्रित केले जाऊ शकते.