महाराष्ट्रातील प्रमुख समूदाय म्हणून मराठा समाजाकडे बघितलं जातं. या समाजाची राज्यातील अंदाजे लोकसंख्या ३० ते ३५ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचा दावा केला जातो.
मराठा समाजामध्येही अनेक उपजाती आहेत. या उपाजातींच्या बाहेर रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत. त्यामुळे ९६ कुळी, ९२ कुळी, ११ माशी, १२ माशी यासह अनेक उपप्रकार आहेत.
९६ कुळी मराठा म्हणजे नेमकं काय? याबाबत 96kulimarathamarriage.com या वेबसाईटने सविस्तर माहिती दिली आहे.
वेबसाईटवरील माहितीनुसार, क्षत्रिय समाजात सोमवंश आणि सुर्यवंश असे दोन प्रमुख वंश आहेत.
क्षत्रिय समाजातील महाराष्ट्रातील मराठी असलेल्या काही कुळांनी एकत्र येउन आपल्या वंशाचा इतर कुळांशी संपर्क होऊ नये म्हणून व्यवहार आणि कुठल्याही प्रकारची सोयरिक क्षत्रिय कुळांच्या बाहेर न करण्याचे बंधन घातले.
पुढे बऱ्याच प्रमाणात ही तत्त्व पाळलीही गेली. त्यावेळी त्या एकत्र आलेल्या कुळांची संख्या ९६ होती म्हणून ही कुळे स्वतःला ९६ कुळी मराठा असे संबोधू लागले.
या कुळांना बऱ्याच शतकांपासून राजवंशाची मान्यता मिळालेली आहे. ९६ कुळे ही मुळात आडनावे आहेत.
परंतु बऱ्याच वेळेस आडनाव हे गावांची नावे, व्यवसाय किंवा पूर्वी मिळलेली पदवी अशा स्वरुपातून पुढे आलेले असते.
म्हणून खरे आडनाव (कुळी) स्वतःला माहीत असणे व आपल्या पुढच्या पिढ्यांना माहीत करुन देणे हे आपले कर्तव्य आहे असे या कुळातील लोक समजतात.
साधारण ३,४८७ आडनावे शोधली गेली आहेत जी स्वत:ला ९६ कुळी मानतात.
त्यामुळे ९६ कुळातील लग्न ठरविताना आडनाव आणि गाव महत्वाचे असते. ९६ कुळाबाहेर सोयरीक केली जात नाही.