आयपीएल २०२५ स्पर्धेत प्लेऑफची शर्यत अंतिम टप्प्यात आली असताना मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ३ गडी राखून पराभव केला. खरं तर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना डकवर्थ लुईस नियमानुसार करावा लागला. या सामन्यात एका षटकात १५ धावांचं टार्गेट देण्यात आलं होतं. शेवटचं षटक टाकण्यासाठी दीपक चहरच्या हाती चेंडू सोपवला होता. पहिल्याच चेंडूवर तेवतियाने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत कोएत्झीला स्ट्राईक दिला. तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला. चौथ्या चेंडू टाकला आणि एक धाव आली, पण हा नो बॉल असल्याची पंचांनी सांगितलं. त्यामुळे तीन चेंडूत २ धावा अशी स्थिती आली. चौथ्या चेंडूवर तेवतियाने एक धाव घेतली आणि धावसंख्या बरोबरीत आली. पाचव्या चेंडूवर कोएत्झी उत्तुंग फटका मारताना झेल बाद झाला. एक चेंडू एक धाव अशी स्थिती असताना अर्शद खान स्ट्राईकला आला आणि एक धाव घेतली. खरं तर या चेंडूवर रनआऊट झाला असता पण हार्दिक डायरेक्ट हीट मारण्याच्या नादात फसला आणि सामना गमावला. या सामन्यानंतर हार्दिक पांड्याने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘मला वाटतं आम्ही खूप चांगली लढाई केली. आम्ही एक संघ म्हणून प्रयत्न करत राहिलो. मला वाटतं ते १५० धावांची खेळपट्टी नव्हती. पण आम्ही २५ धावांनी कमी पडलो होतो. गोलंदाजांना श्रेय द्यावे लागेल. कारण ते संपूर्ण सामन्यात लढत राहिले. सोडलेले झेल तुम्हाला त्रास देतात, पण झेल आम्हाला फारसे त्रास देत नव्हते. मुलांनी मैदानात त्यांचे १२० टक्के योगदान दिले आणि हार मानली नाही याबद्दल खरोखर आनंदी आहोत. पहिल्या डावात मैदान ओले नव्हते, परंतु दुसऱ्या डावात पाऊस येत राहिल्याने आमच्यासाठी ते कठीण होते. आम्हाला खेळ खेळावा लागला आणि आम्ही ते केले.’
गुजरात टायटन्सला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या गेराल्ड कोएत्झीने सांगितलं की, ‘मला वाटले की तो यॉर्कर्ससाठी जाईल, त्या बाउन्सरने मला आश्चर्यचकित केले, मी फक्त यॉर्कर्सबद्दल विचार करत होतो. कदाचित माझ्यात सेलिब्रेशनच्या वेळी आफ्रिकन असेल. संघातील वातावरण खूप चांगले आहे, खूप आरामशीर आहे, ते जमिनीवर स्पष्ट दिसते, परंतु नियोजन चांगले आहे आणि संघातील वातावरण खूप चांगले आहे.’