श्वास रोखून धरायला भाग पाडणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय मिळवला आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 155 धावा केल्या होत्या. मात्र गुजरातच्या डावात 14 आणि त्यानंतर 18 व्या ओव्हरनंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. गुजरातने तोवर 6 विकेट्स गमावून 132 धावा केल्या होत्या. पावसामुळे काही मिनिटं वाया गेली. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर गुजरातला 19 ओव्हरमध्ये 147 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. त्यामुळे गुजरातला विजयासाठी 6 बॉलमध्ये 15 धावा करायच्या होत्या. मुंबईकडून दीपक चाहर याने ही शेवटची ओव्हर टाकली.
गुजरातकडून राहुल तेवतिया आणि गेराल्ड कोएत्झी या जोडीने फटकेबाजी करत गुजरातला विजयाजवळ आणून ठेवलं. मात्र गेराल्ड पाचव्या चेंडूवर कॅच आऊट झाला. त्यामुळे गुजरातला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 1 धावेची गरज होती. सामना बरोबरीत होता. गेराल्ड आऊट झाल्याने युवा अर्शद खान मैदानात आला. मुंबई आणि गुजरातच्या चाहत्यांची धाकधुक वाढली होती. शेवटच्या बॉलवर काय होणार? कोण जिंकणार? याची उत्सूकता चाहत्यांना होती. दीपक चाहरने शेवटचा बॉल टाकला. अर्शद खानने फटका मारला आणि नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने धावत 1 रन घेतली. गुजरातने अशापक्रारे शेवटच्या बॉलवर सनसनाटी विजय मिळवला. गुजरातने डीएलएसनुसार 3 विकेट्सने हा सामना जिंकला. गुजरातने यासह मुंबईचा विजय रथ रोखला. गुजरातचा हा या मोसमातील आठवा विजय ठरला. गुजरातने यासह पॉइंट्स टेबलमध्ये 16 गुणांसह पहिल्या स्थानी स्थानी झेप घेतली. तर मुंबईची पाचव्या पराभवासह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी घसरण झाली.
गुजरातसाठी निर्णायक क्षणी गेराल्ड कोएत्झी याने 12 आणि राहुल तेवतिया याने नाबाद 11 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक धावा केल्या. शुबमनने 46 बॉलमध्ये 43 धावांचं योगदान दिलं. जोस बटलर याने 30 तर शेरफेन रुदरफोर्ड याने 28 धावा जोडल्या. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि अश्वनी कुमार या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत 155 धावांचा यशस्वी बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात ते अपयशी ठरले.
मुंबईने शेवटच्या बॉलवर सामना गमावला
त्याआधी गुजरातने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव या जोडीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. मुंबईसाठी विल जॅक्स याने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने 35 धावा जोडल्या. तर अखेरच्या क्षणी कॉर्बिन बॉश याने निर्णायक 27 धावा केल्या. त्यामुळे मुंबईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 155 धावांपर्यंत पोहचता आलं. विल, सूर्यकुमार आणि कॉर्बिन या तिघांव्यतिरिक्त मुंबईच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. रोहित, हार्दिक, तिलक आणि इतर फलंदाजांना दुहेरी आकाडही गाठता आला नाही. गुजरातचे सहाचे सहा गोलंदाज यशस्वी ठरले. साई किशोर याने दोघांना आऊट केलं. तर मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसिध कृष्णा, राशिद खान आणि गेराल्ड कोएत्झी या 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.