भारताने पाकिस्तानला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर धडा शिकवला आहे. रणनितीनुसार 15 दिवसांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या प्रत्युत्तरानंतर दोन्ही देशात तणाव वाढला आहे. इतकंच भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेवरही परिणाम झाला आहे. वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सीमेवरील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन धर्मशाळा येथे होणारा सामना हलवण्याचा निर्णय घेतला आहे.11 मे रोजी होणाऱ्या पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आल्याचे माहिती आहे. पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामना 11 मे रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे होणार होता. पण पाकिस्तानकडून हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीमेला लागून असलेल्या राज्ये आणि शहरांमधील विमानतळ पुढील काही तासांसाठी बंद केले आहेत.
धर्मशाळा शहर आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त 150 किलोमीटर अंतरावर असल्याने सर्वांच्या नजरा विशेषतः धर्मशाळा येथे होणाऱ्या सामन्यांवर आहेत. यावेळी धर्मशाळा विमानतळ देखील बंद आहे. अशा परिस्थितीत, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे ठिकाण धर्मशाळेहून मुंबईत हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत असून टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, सध्याची स्थिती पाहता मुंबई इंडियन्सचा धर्मशाळा दौरा सध्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. हार्दिक पंड्याचा संघ 7 मे रोजी धर्मशाळेला रवाना होणार होता, पण आता हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम किंवा डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो असे सांगितलं जात आहे. दरम्यान, पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 8 मे रोजी धर्मशाळा येथे खेळवण्यात येणार होता. हा सामना देखील पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआय केंद्र सरकारशी संपर्कात आहे.