पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये पीओके आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने तातडीने आपल्या सुरक्षा विभागाची एक उच्चस्थरीय बैठक बोलावली, या बैठकीमध्ये भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार प़डली, या बैठकीला मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि लष्कर प्रमुखांची उपस्थिती होती.
दरम्यान दुसरीकडे संसदेमध्ये बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे. भारताने फक्त आमच्यावर हल्ला केला नाहीये, तर आमची मजाक उडवली आहे. भारतानं 80 विमानांच्या मदतीनं पाकिस्तानवर हल्ला केला, ज्या पद्धतीने हा हल्ला झाला, त्याला कायम आम्ही लक्षात ठेऊ, पहलगामवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा माझं अनेक देशांसोबत बोलणं झालं होतं, मी संपूर्ण जगाला सांगितलं होतं की, पहलगाममध्ये जो हल्ला झाला, त्याचं पाकिस्तानशी काही देणं घेणं नाही, मात्र भारतानं आमचं म्हणणं ऐकलं नाही, भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आला, भारतानं आमच्यावर हल्ला केला नाही, तर आमची मजाक उडवली, असं शरीफ यांनी म्हटलं आहे.
शंभर पेक्षा अधिक दहशतवादी ठार
दरम्यान भारतानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांची 9 पेक्षा अधिक स्थळ उद्ध्वस्त करण्यात आली असून, शंभर पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडून असा दावा देखील करण्यात आला आहे की, भारतानं फक्त एअर स्ट्राईकच केला नाही तर आमच्या धरणांवर देखील बॉम्ब फेकले त्यामुळे धरणांचं मोठं नुकसान झालं आहे. भारतीय सैनिकांनी नीलम आणि नौसेरी धरणात बॉम्ब टाकल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.