रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर कर्णधारपदी या खेळाडूच्या नावाची चर्चा
GH News May 07, 2025 11:08 PM

आयपीएल 2025 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. असं असताना टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाईल असंच सर्वांना वाटत होतं. पण रोहित शर्माने या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करताना सांगितलं की, ‘हॅलो, सर्वांना सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पांढऱ्या कपड्यात देशाचं नेतृत्व करणं ही खरंच अभिमानाची बाब आहे. मी तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे. गेली अनेक वर्षे तुम्ही मला पाठिंबा दिला. मी वनडे क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.’ आता इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार याची चर्चा रंगली आहे. यात शुबमन गिल याचं नाव आघाडीवर आहे. शुबमन गिलचं नेतृत्व गेल्या काही वर्षात बऱ्यापैकी भावलं आहे. आयपीएलमध्येही त्याच्या नेतृत्वाची झलक दिसून आली आहे.

शुबमन गिलकडे व्हाईट बॉल क्रिकेट संघाचं उपकर्णधारपद आहे. त्यामुळे रोहित शर्मानंतर शुबमन गिल कसोटी कर्णधारपदाचा पदभार स्वीकारेल अशी चर्चा रंगली आहे. इंग्लंड दौऱ्यात पाचही कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे निवडकर्त्यांच्या मनात शुबमन गिलच्या नावाची चर्चा आहे. गिलचं वय आणि फॉर्म पाहता संघाचं दीर्घकाळ नेतृत्व करू शकतो. त्यामुळे त्याचं नाव आघाडीवर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात जून महिन्यापासून होणार आहे. यासाठी निवड समिती गिलला मोठी भूमिका देण्यासाठी उत्सुक आहे. त्याच्याभोवती एक तरुण संघ तयार करण्याचा विचार आहे.’

25 वर्षीय शुबमन गिल कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर आणि तिसऱ्या क्रमांकावर खेळला आहे. रोहित शर्माने निवृत्ती घेतल्याने आता सलामीला येणार यात काही शंका नाही. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल ही जोडी कसोटीत ओपनिंग करताना दिसेल. शुबमन गिल 32 कसोटी सामने खेळला असून 5 शतकं आणि 7 अर्धशतकांसह 1893 धावा केल्या आहे. मागच्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व करत आहे. त्याचं संयमी नेतृत्व सर्वांनाच भावलं आहे. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.