भारताच्या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 जण ठार, स्वतःच दिली माहिती
BBC Marathi May 08, 2025 01:45 AM
Getty Images

भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केल्याचं भारत सरकारनं सांगितलं.

या कारवाईत बंदी असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद चा म्होरक्या मसूद अझहर याच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि 4 निकटवर्तीय ठार झाले आहेत. मसूद अझहरने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.

भारतीय सैन्यानं भवलपूर येथील सुभान अल्लाह मशिदीवर केलेल्या हल्ल्यात कुटुंबीय आणि निकटवर्तीय ठार झाल्याचं त्यानं सांगितलं आहे.

मौलाना मसूद अझहरनं बुधवारी (7 मे) काढलेल्या निवेदनात याबाबत माहिती दिली आहे.

या हल्ल्यात मौलाना मसूद अझहरची मोठी बहीण आणि त्यांचा पती, मसूद अझहरचा भाचा आणि त्याची पत्नी, भाची आणि पाच लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.

तसंच, मसूद अझहरचा एक निकटवर्तीय सहकारी, त्याची आई आणि आणखी दोन निकटवर्तीय या हल्ल्यात ठार झाले असल्याचं त्याने या निवेदनात म्हटलं आहे.

या निवेदनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही करण्यात आली आहे.

9 ठिकाणांना केले लक्ष्य

भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करत, 9 ठिकाणांना क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य केलं आहे. भारत सरकारनं एका निवेदनाद्वारे या क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती दिली.

भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलंय की, "या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं आहे. याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली."

Getty Images

भारताच्या कारवाईबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिलीय.

शाहबाज शरीफ म्हणाले की, "भारताच्या या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार पाकिस्तानला आहे. आणि आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देत आहोत. संपूर्ण पाकिस्तान लष्करासोबत उभा आहे आणि देशाचं मनोधैर्य मजबूत आहे."

जैश-ए-मोहम्मद संघटना काय आहे?

जेईएम म्हणजेच जैश-ए-मोहम्मदचा शब्दशः अर्थ मोहम्मदची सेना असा होतो.

भारताने 1999 मध्ये मसूद अझहरची सुटका केल्यानंतर त्यानं या गटाची स्थापना केली. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण त्यावेळी तालिबानची सत्ता असलेल्या अफगाणिस्तानात नेण्यात आलं होतं. त्यावेळी विमानातील क्रू आणि प्रवाशांच्या बदल्यात अझहरसह तीन जणांना सोडण्यात आले होते.

मसूद अझहरनं त्यावेळी माजी तालिबानी नेता मुल्ला ओमर आणि अल-कायदा प्रमुख ओसामा बिन लादेन यांची भेट घेतली होती, असं वृत्तही समोर आलं होतं.

Getty Images

डिसेंबर 2001 मध्ये दिल्लीत संसदेवर झालेल्या हल्ल्यामाहे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचं भारताचं म्हणणं आहे. जैश-ए-मोहम्मदनं मात्र कायम हे आरोप फेटाळले आहेत.

या हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मदवर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली. पण तरीही हा गट अजूनही कार्यरत आहे.

जानेवारी 2016 मध्ये पाकिस्तानी सीमेजवळील एका हवाई तळावर झालेल्या हल्ल्यासाठीही भारताने जैश-ए-मोहम्मदला जबाबदार धरलं होतं. त्यात सुरक्षा दलाचे तीन सदस्य मृत्युमुखी पडले होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.