Indus Water Treaty : आधी सर्जिकल स्ट्राईक; आता पाण्याचे दुर्भीक्ष्य
esakal May 08, 2025 10:45 AM

इस्लामाबाद : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने अडचणीत आलेल्या पाकिस्तानला आता अंतर्गत संघर्षालाही तोंड द्यावे लागत आहे. सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानच्या काही भागांवर आधीच पाण्याचे संकट घोंघावू लागले आहे. त्यात आता या कराराचा प्रभाव नसलेल्या भागांमध्येही भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. रावळपिंडी आणि इस्लामाबाद या दोन प्रमुख शहरांसाठी केवळ ३५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

पाकिस्तानमधील वृत्तपत्र ''द डॉन''ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. रावळपिंडी व इस्लामाबादला पाणीपुरवठा करणाऱ्या खानपूर धरणात केवळ ३५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. या धरणातील पाण्याने तळ गाठला आहे.

खैबर पख्तुन्ख्वावर पुन्हा अन्याय

इस्लामाबाद व रावळपिंडीला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन आता पंजाब प्रांत व खैबर पख्तुन्ख्वा येथील सिंचनासाठीचे पाणी वळवण्याचा विचार करत आहे. यामुळे खैबर पख्तुनख्वा भागात आधीपासूनच धुमसत असलेला असंतोष पुन्हा उफाळून वर येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी न लावल्यास या भागातील पाण्याची परिस्थिती आणखी चिघळू शकते.

प्रत्यक्ष परिस्थिती काय?

खैबर पख्तुनख्वा प्रांतातील खानपूर या गावाजवळ हे धरण बांधण्यास पाकिस्तानला १५ वर्षे लागली. १९८३ मध्ये हे धरण बांधून पूर्ण झाले. इस्लामाबादपासून हे धरण ४० किलोमीटर अंतरावर आहे. रावळपिंडी व इस्लामाबाद या दोन शहरांसाठी यातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो, तर खैबर पख्तुन्ख्वा व पंजाब प्रांतातील काही भागांमधील कृषी सिंचन व औद्योगिक क्षेत्रासाठीही येथूनच पाणी पुरवठा होतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.