मदर आरोग्य विमा: वैद्यकीय खर्च आणि अनपेक्षित आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढत असताना, विमा आता फक्त बॅकअप योजना न राहता एक विचारपूर्वक गुंतवणूक ठरतो आहे. महिलांसाठी, विशेषतः मातांसाठी, संपूर्ण आरोग्य विमा संरक्षण हे एक महत्त्वाचे सुरक्षा कवच ठरते. यामुळे अनपेक्षित वैद्यकीय खर्चांपासून कुटुंबावरील अर्थसंकट वाचते. हे विमा संरक्षण अगदी गर्भधारणा आणि प्रसूतीपासून, प्रसवोत्तर काळजी आणि बालसंगोपनापर्यंत जीवनाच्या सर्व टप्प्यांवर लागू होते. दीर्घकालीन नियोजनाचे महत्त्व यातून अधोरेखित होते.
गर्भधारणेशी संबंधित वैद्यकीय खर्च अनेक वेळा लाखो रुपयांमध्ये जातो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर आर्थिक ताण येऊ शकतो. नॅशनल हेल्थ सर्व्हे 5 नुसार, भारतातील 21.5% जन्म सध्या सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे होतात. त्यामुळे मातृत्व, प्रसूती देखभालीच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, सध्या सर्व प्रकारच्या आरोग्य विमा दाव्यांमध्ये मातृत्वाशी संबंधित दाव्यांचे प्रमाण सुमारे 20% आहे. मेट्रो शहरांमध्ये सिझेरियन ऑपरेशनचा खर्च 75,000 रु. ते 2,00,000 रु. दरम्यान असतो, तर सामान्य प्रसूतीचा खर्च साधारणपणे 50,000 ते 1,00,000 रु. पर्यंत असतो. जर गर्भधारणा किंवा प्रसूतीदरम्यान काही गुंतागुंत उद्भवली, तर हे खर्च आणखी वाढू शकतात. नव्या जीवाचे स्वागत करण्याचा आनंद घेण्याच्या क्षणी आर्थिक चिंता ही आपल्या मनाला भेडसावणारी सर्वात शेवटची गोष्ट असावी. म्हणूनच सुरुवातीपासूनच मातृत्व व प्रसूती पश्चात असे दोन्ही खर्च संरक्षित करेल अशा चांगल्या आरोग्य विमा योजनेची निवड करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही गर्भधारणेचा प्रवास तणावमुक्तपणे अनुभवू शकाल, त्याचा आनंद घेऊ शकाल.
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने मातृत्वाशी संबंधित खर्चासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये प्रसवपूर्व आणि प्रसवोत्तर वैद्यकीय खर्च तसेच नवजात अर्भकाचे बालसंगोपन यांचा समावेश आहे. यामध्ये वैध व वैद्यकीय गर्भपाताचाही समावेश आहे. मात्र, ही सुविधा विमाधारकाच्या आयुष्यात जास्तीत जास्त दोन प्रसूती किंवा गर्भपातांपर्यंतच मर्यादित आहे. शिवाय, सिझेरियन असो किंवा सामान्य प्रसूती—रुग्णालयात भरतीदरम्यान होणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा समावेशही केला जातो.
माता त्यांचे लक्ष फक्त मुलांच्या संगोपनावर केंद्रित करत असतात. यामुळे अनेकदा मातांचे आरोग्य त्यांच्या स्वत:साठी दुय्यम ठरते. त्यामुळे कुटुंबांनी महिलांसाठी वेलनेस इन्सेंटिव्ह्स आणि प्रतिबंधात्मक तपासणीचा समावेश असलेल्या आरोग्य विमा योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आरोग्यावर लक्ष ठेवण्यास आणि आजार टाळण्यास मदत करतील असे आरोग्य स्वास्थ्य लाभ असलेली विमा योजना निवडली पाहिजे. उदाहरणार्थ, वार्षिक आरोग्य तपासणी करणे, तंदुरुस्त राहण्यासाठी काही उपाययोजना करणे, फिटनेस वर्गांमध्ये सहभागी होणे अशा गोष्टींवर आरोग्य विमा योजना स्वास्थ्य लाभ सवलतही देतात. या प्रतिबंधात्मक उपायांमुळे गंभीर आणि प्राणघातक आजारांचे लवकर निदान व उपचार शक्य होते. गंभीर आजाराचे निदान व उपचारांसाठी संपूर्ण विमा संरक्षण असेल अशा योजनेचा विचार करा. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्याबरोबर बरे होण्यावर लक्ष केंद्रित करता येईल.
फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना संपूर्ण कुटुंबाला विमा संरक्षण देते आणि त्यामुळे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या योजना घेण्याची गरज भासत नाही. संपूर्ण कुटुंबाच्या विमा संरक्षणासाठी एकच प्रीमियम भरावा लागतो. यामध्ये तुम्ही स्वतः, तुमचे जोडीदार आणि अवलंबून असलेली मुले यांचा समावेश करू शकता. काही योजना भावंडे, सासू-सासरे आणि अवलंबून असलेल्या पालकांचाही समावेश करू देतात. मातांसाठी विमा योजना घेताना, सर्व पॉलिसी कागदपत्रे नीट तपासणे अत्यावश्यक आहे. तसेच, विमा सल्लागाराचा सल्ला घेऊन नियम आणि अटी समजून घेणे उपयुक्त ठरते. पॉलिसी कालावधी, सम इंश्युअर्ड पर्याय आणि आवश्यकतेनुसार कुटुंबातील सदस्याचा समावेश देणारी लवचिकता असलेल्या योजनेचा विचार करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारात उपलब्ध इतर योजनांच्या तुलनेत स्पर्धात्मक, वाजवी प्रीमियम दरात उच्च सम इंश्युअर्ड असलेली योजना निवडणे अधिक फायदेशीर ठरेल.
आरोग्य विमा ही काळजी आणि प्रेमाची कृती आहे. ती कुटुंबाला दररोजच्या आरोग्यप्रती सजग राहण्यास प्रवृत्त करते. मातांसाठी, आरोग्य विमा योजना वेळेवर उपचार, आरोग्यदायी जीवनशैली, आणि नियमित तपासणीस प्रोत्साहन देते. विमा हे घरातील काळजी आणि सुरक्षेचे अदृश्य नाते संरक्षित करतो. प्रत्येक कुटुंब सदस्याच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्या आरोग्याला प्राधान्य देतो.
अधिक पाहा..