मृण्मयी देशपांडे - अभिनेत्री
शेतावरचे माझे दिवस फारच मजेत जात होते. सकाळी बरोबर साडेसहा वाजता कार्बन आणि हनीवा उठवायचे. मग त्यांना घेऊन बाहेर फिरायला जायचं. आल्यावर शांत बसून चहा. साडेदहा वाजता माझी सगळी कामं आटपून, जेवण बनवून मी मोकळीसुद्धा झालेले असायचे. मग उरलेला वेळ फक्त वाचन, लिखाण आणि खूप काळापासून बघायच्या राहिलेल्या अनेक गोष्टी यामध्ये जात होता. महाबळेश्वरला मे महिना असला, तरी उन्हाचा तडखा जाणवत नाही. संध्याकाळी तर थंडीच वाजते... मला एकटीला मजा येते आहे, याचा स्वप्नीलला मात्र विशेष त्रास होत होता.. आणि त्याला त्रास होतोय म्हणून मला विशेष मजा येत होती! चार एक दिवस झाल्यानंतर त्यानं मला विचारलंसुद्धा, ‘‘झाला असेल स्वतःबरोबर वेळ घालवून तर येऊ का?’’ त्यावर मी फक्त ‘नको’ एवढंच उत्तर दिलं... पुढचे दोन दिवस फुगा फुगला होता.
मी शेतावर एकटी राहते आहे, हे मात्र आमच्या गणपतमामांना काही केल्या पटत नव्हतं. माझी तक्रार स्वप्नीलकडेसुद्धा करून झाली होती आणि ‘तुम्ही त्यांचं (म्हणजे माझं) ऐकू नका. काहीही करून तुम्ही इकडे या’, असा सल्लाही त्याला देऊन झाला होता. असंच एक दिवशी घरी जाताना ते बोलले, ‘‘ताई, सकाळपासून वारं काय बरोबर नाही! तुम्ही सरळ आमच्या घरी या, किंवा अप्पांकडे राहायला जा; पण आज रात्री शेतावर एकटं थांबू नका!’’ मी त्यांना - ‘काही होत नाही’, ‘मी कशी स्ट्रॉंग आहे’, ‘घर कसं सेफ आहे’ या सगळ्या गोष्टी समजवल्या आणि कसंबसं परत पाठवलं. ते गेले आणि १५-२० मिनिटांमध्येच पूर्ण अंधारून आलं.
मे महिन्यामध्ये खरंतर साडेसात-आठ वाजेपर्यंत प्रकाश पसरून राहिलेला असतो.. साडेपाच वाजता ढग भरून आले.. कार्बन आणि हनिवा नेहमीसारखे कुठेतरी हुंदडायला गेले होते, तेसुद्धा घरी आले. हवेचा जोर वाढायला लागला, तशी मला भीती वाटायला लागली- कारण आमच्या व्हरांड्यामध्ये असलेल्या खुर्च्यासुद्धा त्या वेगानं पडायला लागल्या होत्या. माझी धावपळ सुरू झाली. पडून फुटू शकतील अशा सगळ्या वस्तू आत ठेवण्याचं काम सुरू झालं. वाऱ्याचा वेग इतका वाढला, की मला बाहेर जाऊन गोष्टी आत आणायलासुद्धा भरपूर वेळ लागत होता. दार उघडलं, की आपटत होतं... आणि दुरून विजेचा प्रचंड मोठा आवाज झाला... हनिवा घाबरून आत पळाली आणि पलंगाखाली जाऊन लपून बसली. त्या आवाजाबरोबर प्रचंड मोठा वाऱ्याचा झोत आला. त्याचा फटका इतका मोठा होता, की मी चार पावलं मागे ढकलले गेले. मला अक्षरशः वाटलं, की अख्खं घर उडून जाईल की काय?!.. ‘सोसाट्याचा वारा’ हा शब्दप्रयोग मी जगत होते.
बघताबघता गडद अंधार झाला आणि आकाशामध्ये एक भलीदांडगी वीज लकाकली.. हे लक्षण फक्त पावसाचं नाही, तर पावसाळ्याच्या आधी येणाऱ्या वादळी पावसाचं होतं. दूरवरून आणखी घणाणता वारा आला आणि बरोबर पावसाला घेऊन आला. त्या पावसाचा तडाखाही इतका होता, की क्षणार्धात मी नखशिखांत भिजून गेले. बाहेरच्या गाद्या भिजल्या. अजून पुस्तकं आत ठेवायची राहिली होती. मी ती कशीबशी आत घेतली. आत आले, दार लावून घेतलं.. त्या क्षणी लाईट गेले. आतमध्ये किर्र अंधार. मी मेणबत्ती शोधायला लागले.. आणि दोन सेकंद सगळं घर, सगळं शेत उजळून निघालं.. मला क्षणभर वाटून गेलं लाईट परत आले की काय.. पण आता आकाशातली लायटिंग चालू झाली होती! आमचं घर आणि व्हरांड्यामधलं दार पूर्ण काचेचं आहे.. दाराच्या अलीकडून मी पलीकडे चाललेला विजांचा नाच बघायला लागले. असं काही मी या आधी कधी पाहिलंच नव्हतं. नजरेसमोर पसरलेलं आकाश आणि आकाशभर पसरलेल्या विजा..
पुन्हा काही क्षण पूर्ण काळोख झाला.. आणि माझ्या लक्षात आलं, कार्बन घरात दिसत नाहीये. घाबरून मी बाहेर जाऊन त्याला शोधावं म्हणून दारापाशी गेले आणि दार उघडणार तेवढ्यात आणखी एक वीज चमकली आणि त्या प्रकाशात मला कार्बन दिसला. रेलिंगच्या गजांच्या फटीमधून बाहेर बघत होता... न घाबरता एकटक बाहेर बघत होता. वाऱ्यानं त्याचे केस जवळजवळ सिनेमांमधल्या हिरोईनसारखे उडत होते. मी त्याला आत बोलावलं; पण तो यायला तयार नव्हता. का कोण जाणे मला त्याच्याजवळ जाऊन बसावंसं वाटलं. ते वादळ तो जसा बघतो आहे तसं बघावंसं वाटलं. मी जाऊन बसले. त्याला अगदी खेटून बसले. समोर विजांचं थैमान चालू होतं. वारं घोंगावत होतं; पण कार्बन कुशीत असल्यामुळे मला उबदार वाटत होत.. अक्षरशः दोन-दोन सेकंदांनी विजा चमकत होत्या. त्या सगळ्या उभ्या विजा होत्या आणि तेवढ्यात आकाशात एक वीज चमकली... आडवी... जणू काही इंद्राचं वज्र.. एक आडवी रेष आणि जणू तिला फुटलेल्या अनेक फांद्या... ते पाहिलं आणि मी स्तीमित झाले... शांत झाले.. त्या निसर्गाच्या तांडवापुढे नतमस्तक झाले.. त्या बाहेरच्या वादळामुळे माझ्या आतलं कुठलं तरी वादळ शांत होत होतं.. माझ्या आयुष्यातल्या न विसरणाऱ्या क्षणांपैकी हा एक झाला होता..
(*या घटनेचा व्हिडियो छोट्या रील स्वरूपात मी शूट केला होता.. आमच्या नील आणि मोमोच्या इंस्टा हँडलवर, हा लेख प्रसिद्ध झाला की मी पिन करून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता!)
(क्रमश:)