मुंबई : म्युच्युअल फंड एसआयपी खाती बंद होण्याचं गुणोत्तर एप्रिल महिन्यात 296 टक्क्यांवर पोहोचलं आहे. म्युच्युअल फंडमधील खाती बंद होण्याचं किंवा गुंतवणूक कालावधी पूर्ण झाल्यानं मॅच्युअर होण्याची टक्केवारी मार्च महिन्यात 128.27 टक्के होती. एप्रिल 2024 मध्ये ती टक्केवारी 52.24 टक्के होती. ही टक्केवारी वाढण्याचं कारण गुंतवणूकदार एसआयपी खाती बंद करत आहेत किंवा त्यांच्या सध्याच्या एसआयपीचा कालावधी संपला आहे. दुसरीकडे एप्रिल महिन्यात नव्यानं सुरु होणाऱ्या खात्यांची संख्या देखील समोर आहे.
एप्रिल 2025 महिन्यात एसआयपी खाती बंद होण्याची किंवा गुंतवणूक कालावधी संपलेल्या खात्यांची संख्या 136.99 लाख इतकी आहे. तर, एप्रिल महिन्यात नव्यानं सुरु झालेल्या खात्यांची संख्या 46.01 लाख इतकी आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये थकबाकी असलेल्या एसआयपी खात्यांची संख्या 914.41 लाख इतकी आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बंद होणाऱ्या खात्यांची टक्केवारी 75.63 टक्के इतकी होती. 2024-25 मध्ये 514.17 लाख खाती बंद झाली तर 649.85 लाख खाती नव्यानं उघडण्यात आली.
एप्रिल महिन्यात ज्या एसआयपी खात्यांतून गुंतवणूक सुरु आहे, अशा खात्यांची संख्या 838.25 लाख इतकी आहे. एप्रिल महिन्यात एसआयपी द्वारे म्युच्युअल फंडमध्ये 26632 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.
एसआयपी स्टॉपेज गुणोत्तर म्हणजे एसआयपी खाती बंद झालेल्या किंवा गुंतवणूक थांबलेल्या खात्याची संख्या आणि नव्यानं गुंतवणूक सुरु होणाऱ्या एसआयपी खात्यांची संख्या याचं प्रमाण होयं.एसआयपी स्टॉपेज गुणोत्तरात ज्या एसआयपी खात्यांचा कालावधी पूर्ण झालाय त्याची देखील गणना केली जाते. अनेकदा गुंतवणूकदार एसआयपी खात्यांची अदलाबदल करत असतात.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडियाच्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंडमध्ये एसआयपी खात्यातून 26632 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मार्च महिन्यात एसआयपीद्वारे 25926 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या 8.38 कोटी इतकी आहे. भारतीय गुंतवणूकदारांकडून करण्यात येणाऱ्या दरमहा गुंतवणुकीमुळं भारतीय शेअर बाजाराला आधार मिळाला आहे.
दरम्यान, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून गेल्या सहा महिन्यांमध्ये भारतीय शेअर बाजारातील समभागांची विक्री करण्यात आली होती. त्यावेळी भारतीय शेअर बाजाराला देशांतर्गत गुंतवणुकीमुळं आधार मिळाला होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..