Operation Sindoor: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत आलेल्या पर्यटकांन लक्ष्य करून त्यांच्यावर गोळीबार करत दहशतवाद्यांनी 26 जणांचा जीव घेतला. या हल्ल्यामुळे अख्खा देश हादरला, शोकव्हिवल झाला. याचा बदाला घेण्यासाठी 6-7 मे च्या रात्री भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर मिसाईल डागत ते उद्ध्वस्त केले. त्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. अमेरिका, इस्रायल आणि फ्रान्स सारख्या देशांनी या अचूक कारवाईला पाठिंबा दिला, संपूर्ण जग भारताच्या पाठिशी उभं आहे. मात्र 3 मिस्लिम देशांच्या कुरापती मात्र सुरूच आहेत. तुर्की, अझरबैजान आणि कतारने पाकिस्तानच्या बाजूने निवेदन देत भारताच्या कारवाईबद्दल चिंता व्यक्त केली.
तुर्कीने पाकिस्तानबद्दल सहानुभूती व्यक्त करत भारताची ही कृती म्हणजे, युद्धाचा धोका असल्याचे म्हटले. या मुद्द्यावर, तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने X वर ट्विटही केलं : ” 6-7 मे च्या रात्री भारताने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या युद्धाच्या धोक्याबद्दल आम्हाला चिंता आहे. चिथावणीखोर कृती आणि नागरी लक्ष्यांना, टार्गेट करण्याचा आम्ही निषेध करतो” असे त्यात म्हटले. त्यांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगत राजनैतिक तोडगा काढण्याचे आवाहन केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला, ज्यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी स्थानावर हल्ला झाला नाही असे भारताने आधीच स्पष्ट केलं आहे.
अझरबैजानने केली हल्ल्याची निंदा
भारताच्या या कृतीवर अझरबैजाननेही नकारात्मक प्रतिक्रिया दिली. “भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल आम्हाला चिंता आहे. आम्ही पाकिस्तानवरील लष्करी हल्ल्यांचा निषेध करतो ज्यामध्ये नागरिकांचा मृत्यू झाला”असे ते म्हणाले. ही घटना एकतर्फी आक्रमकता असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तानमधील पीडित कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला. मात्र भारताने हे स्पष्ट केलं होतं की ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेले सर्व हल्ले हे फक्त दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवरच झाले.
कतारचं राजकारण आणि तणाव कमी करण्याचं आवाहन
या सर्वांत कतारचे विधान थोडं संतुलित होते, परंतु त्यात त्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्यास आणि तणाव कमी करण्यास स्पष्टपणे सांगितलं. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले की, “आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावावर खूप चिंतेने लक्ष ठेवून आहोत. दोन्ही देशांनी संयम, चांगले शेजारी असण्याच्या तत्त्वांचे पालन करावे आणि राजनैतिक मार्गाने वाद सोडवावे, असे आम्ही आवाहन करतो” असे त्यांनी नमूद केलं.
वैश्विक समर्थन आणि विरोध
ऑपरेशन सिंदूर ही भारताची कारवाई अचूक आणि संयमी पाऊल असल्याचे म्हणत अमेरिका, इस्रायल आणि युरोपीय देशांनी या घटनेचे कौतुक केले. ऑपेरशन सिंदूरअंतर्गत केलेले हे हल्ले, कोणत्याही पाकिस्तानी नागरी, लष्करी किंवा आर्थिक आस्थापनांवर नव्हते. फक्त जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या बालेकिल्ल्यांना लक्ष्य करण्यात आले, असे भारतातर्फे आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे.
मात्र दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून पाकिस्तानने या हल्ल्याचे वर्णन “युद्धाची घोषणा” असे केले. तसेच प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र आणि ओआयसीमध्येही हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.