कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमण हटवा
esakal May 08, 2025 11:45 PM

वाशी, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कांदळवन भागात असलेली अतिक्रमणे तत्काळ हटवण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहे. अतिक्रमणाबाबत आढावा घेत कांदळवन भागात ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे रेकॉर्डवर आले आहे ते हटविण्यासंदर्भात त्यांनी निर्देश दिले. अतिक्रमण कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून प्रभावी उपाययोजना करा, असे देखील महापालिका प्रशासनास बजावले आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कांदळवन भागात असलेले अतिक्रमण हटविण्यासाठी कशा पद्धतीने कारवाई केली जात आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कांदळवनाचे संरक्षण केले जात आहे याची सविस्तर माहिती दिली. कांदळवन क्षेत्रात असलेल्या जवळजवळ ७०० पेक्षा अधिक झोपड्या पालिकेने काढल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. गणेश नाईक यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, नगररचना अधिकारी सोमनाथ केकाण, तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.