ऐन उन्हाळ्यात वेदगंगा तुडुंब
esakal May 08, 2025 11:45 PM

62614
नानीबाई चिखली ः येथे तुडुंब भरून वाहत असलेली वेदगंगा नदी.
......
ऐन उन्हाळ्यात वेदगंगा तुडुंब

धरणांत मुबलक साठा ः पाटबंधारेच्या योग्य नियोजन, शेतकऱ्यांतून समाधान

रमजान कराडे ः सकाळ वृत्तसेवा
नानीबाई चिखली, ता. ८ ः गेल्या दोन महिन्यांत तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. मे महिन्यात तर तापमानाचा पारा ४० अंशांकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होईल अशी शंका होती. परंतु गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणे पूर्णक्षमतेने भरली होती. पाटबंधारे विभागानेही योग्य नियोजन केल्याने सध्या धरणांत मुबलक पाणीसाठा आहे. कागल तालुक्यातील वीस-पंचवीस तसेच सीमावर्ती भागातील दहा-बारा गावांसाठी वरदान ठरलेली वेदगंगा नदी ऐन उन्हाळ्यात तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
पाटगाव धरणातील पाण्याचा लाभ कागल तालुक्यातील निढोरीपासून पूर्वेकडे असलेल्या नानीबाई चिखली गावापर्यंत सुमारे वीस-पंचवीस गावांना होत नव्हता. त्यामुळे जानेवारीनंतर पुढे जूनपर्यंत वेदगंगा नदी कोरडीच असायची. जिथे पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहायचे तेथे शेती पिकवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता.
पाण्यावाचून शेतकऱ्यांची होणारी ही अवस्था पाहत काळम्मावाडी धरणातून येणारे पाणी आदमापूरजवळ असलेल्या टाका नाला ओढ्यातून वेदगंगेत १९९४ मध्ये सोडले. पुढे तेच पाणी कर्नाटक राज्यातही करारानुसार सोडले जाऊ लागले. त्यामुळे दरवर्षी पाण्याअभावी कोरडी पडणारी वेदगंगा गेली कित्येक वर्षे अपवाद वगळता बारमाही वाहत आहे. यामुळे नदीकाठावर ऊस हे मुख्य पीक बनले. शिवाय रब्बी पिकांनाही नदीतील पाण्याचा फायदा झाला.
गेल्यावर्षी सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्णक्षमतेने भरली होती. तसेच पाऊसही बराच काळ लांबल्याने नदीतील पाणीपातळी लवकर खालावली नव्हती. त्यामुळे पाटबंधारे विभागानेही धरणातील पाणी डिसेंबरनंतर नदीपात्रात सोडताना अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन केले. त्यामुळे नदीतील पाणीपातळी खालावणार नाही तसेच नदी कोरडीही राहणार नाही याची काळजी घेतानाच आवश्यक तेवढे पाणी सोडताना नदीत सातत्याने पाणी कसे राहील हे पाहिले. यामुळेच मे महिन्यातही वेदगंगा तुडुंब भरलेली पाहायला मिळत आहे.
.....
चौकट...
ऊस क्षेत्र २० टक्क्यांनी वाढले
कागल तालुक्यात खासगी, सहकारी असे पाच साखर कारखाने आहेत. गेल्या दोन वर्षांपासून काळम्मावाडी धरणाची गळती काढली जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाने नव्याने ऊस लावण करू नये, असे आवाहन केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाकडे कानाडोळा केला. मात्र गेल्यावर्षी चांगला झालेला पाऊस, धरणातील मुबलक साठा, तुडुंब भरून वाहणाऱ्या वेदगंगा, दूधगंगा नद्या, यामुळे यावर्षी २० टक्क्यांनी ऊस क्षेत्रात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.