India vs Pakistan War: 'पाकिस्तानने युद्ध निवडलं...', भारतीय सैन्याने दिलेल्या चोख उत्तरानंतर सेहवाग, शिखर धवनकडून प्रतिक्रिया
esakal May 09, 2025 08:45 AM

भारतातील जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचे भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आली. त्यानंतर दोन्ही देशाकडून एकमेकांवर हल्ले सुरू झाले आहेत. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानचे जवळपास सर्व हल्ल्यांचे प्रयत्न फोल ठरवण्यात आले आहेत.

पाकिस्तानकडून आलेले ड्रोनही भारतीय सैन्याकडून पाडण्यात आले आहेत. तसेच भारताकडूनही हल्ल्यांचे चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भारताकडून पाकिस्तानमधील एअर डिफेन्स सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आलेत, याशिवाय पाकिस्तानमधील अनेक प्रमुख शहरांवरही हल्ला करण्यात आला आहे. कराची बंदरातही ८ ते १२ स्फोट झाले असून पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिथे ब्लॅकआउट करण्यात आले आहे. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला देण्यात आलेल्या चोख प्रत्युत्तराबाबत भारतीय क्रिकेटपटूंनीही सोशल मिडिया पोस्ट केल्या आहेत.

भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने एक्सवर (आधीचे ट्वीटर) पोस्ट केली आहे की 'पाकिस्तानला शांत राहण्याची संधी असताना त्यांनीच युद्ध निवडले. ते त्यांच्या दहशतवादी संपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढे आले, हीच गोष्टी त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जाते. आपले सैन्य योग्य पद्धतीने याचे प्रत्युत्तर देईल, जे पाकिस्तान कधीही विसरणार नाही.'

याशिवाय शिखर धवननेही पोस्ट केली आहे की 'जम्मूवरील ड्रोन हल्ला थांबवण्यासाठी आणि इतक्या ताकदीने आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपल्या शूरवीरांबद्दल आभिमान वाटत आहे. भारत खंबीरपणे उभा आहे. जय हिंद!'

भारत-पाकिस्तान युद्धाचा क्रिकेटला फटका

दरम्यान, सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीग या टी२० क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहेत. पण दोन्ही देशातील बिघडलेली परिस्थिती पाहाता, दोन्ही देशांमधील या स्पर्धांना फटका बसण्याची शक्यता आहे. दोन्ही स्पर्धांमधील गुरुवारचे सामने रद्द झाले आहेत. पाकिस्तान सुपर लीगमध्ये रावळपिंडी येथे गुरुवारी पेशावर झालमी आणि कराची किंग्स संघात सामना होणार होता. पण हा सामना सुरू होण्यापूर्वीच रद्द झाला. तसेच आयपीएल २०२५ मधीलही धरमशाला येथे होत असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना १०.१ षटकानंतर रद्द करण्यात आला आहे. तसेच आता दोन्ही स्पर्धा स्थगित होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.